उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : नदीत पात्राच्या पाण्यात झपाट्याने वाढ
पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा
पन्हाळा तालुक्यात मागील आठवड्याभरात झालेल्या सततच्या पावसामुळे वारणा, कुंभी आणि कासारी नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठची शेती जलमय होऊन खरिपाच्या पूर्व तयारीवर मोठा परिणाम झाला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील वारणा खोऱ्यातील झाकले केखले, बोरपाडळी परिसरात मोठ्या प्रमाणात भुईमूग, सोयाबीन यासारख्या उन्हाळी पिकांची लागवड केली जाते. तर पश्चिम भागातील कासारी खोऱ्यात मका व भाताची लागवड सामान्यतः जूनपूर्वी केली जाते. मात्र सध्याच्या अनपेक्षित व असमय पावसामुळे पिकांची कापणी व मळणी रखडली असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांना मोड आले आहेत.
खरिपासाठी आवश्यक असलेल्या पूर्व मशागतीचे काम देखील पावसामुळे थांबले आहे. नांगरणी, कोळपणी, चोथकट वेचणी, बांधबंदी, रोप उगवणीसाठी लागणारे कळंबोली कामे अद्याप सुरूही होऊ शकलेली नाहीत. यामुळे येत्या पंधरवड्यात खरिपाची पेरणी करायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
सलग आठवडाभर पावसाने तळ ठोकल्यामुळे ऊस शेतीत सऱ्या भरून गेल्या आहेत. परिणामी जनावरांसाठी चारा आणणे, शेतात कामे करणे अशक्य बनले आहे. यामुळे पशुपालकही चिंतेत आहेत.
तालुक्यातील प्रमुख नद्या – वारणा (पूर्व), कुंभी व कासारी (पश्चिम) यांमध्ये पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये शेती जलमय झाल्याने पुराचा धोका निर्माण झाला असून काही ठिकाणी शेतजमीन वाहून जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
पावसाच्या अनियमिततेमुळे निसर्गचक्र बिघडत असल्याचे शेतकरी व्यक्त करत असून शासनाने वेळीच पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
