दोन मानेंची कसोटी
हातकणंगले विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे)
हातकणंगले संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती बरखास्त झाल्यानंतर नव्या अध्यक्षपदासाठी दावेदारी सुरू झाली आहे. यावरुनच शिवसेना खासदार गट आणि जनसुराज्यमधील आमदार गट यांच्यात ‘जुंपण्याची’ लक्षणं दिसू लागली आहेत. यामुळे खा. धैर्यशील माने आणि आ.अशोकराव माने यांच्या कसोटीचा काळ आहे. आता पहावे लागेल ते यामध्ये समन्वय साधून कोणाला संधी देतात.
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर महामंडळ आणि विविध कल्याणकारी समित्यांची पुनर्रचना होणार, असे बोलले जात होते. परंतू, या समित्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे कामकाज सुरू ठेवण्याचे परिपत्रक काढल्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. आता कायमस्वरूपी आपणच या पदावर राहणार, अशी शक्यता त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात होती.
हातकणंगले संजय गांधी समिती ही महत्वपूर्ण मानली जाते. या समितीवर खासदार माने गटाचे झाकीर भालदार यांची अध्यक्षपदी त्यावेळी निवड केली होती. परंतू, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अध्यक्षपदाची मागणी जोर धरू लागली. याला विधानसभा निवडणुकीतील प्रचारही काहीसा कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. अध्यक्षपद विद्यमान आमदारांकडेच असावे, अशी भूमिका घेवून डॉ.अशोकराव माने यांनी हालचाली सुरू केल्या. मुख्यमंत्र्यांचा इचलकरंजीत दोन दिवसांपूर्वी दौरा झाल्यानंतर या घडामोडींना वेग आला आणि सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने हातकणंगले संजय गांधी समिती बरखास्त केल्याचे आदेश निघाले. विशेष म्हणजे याची कानोकान खबर खासदार माने गटाला नव्हती.
नवं अध्यक्षपद; उत्सुकता शिगेला
ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा समिती अध्यक्ष, असा फार्म्युला ठरल्याचे कळते. तर सदस्यांच्या जागा वाटपात 30:30:30:10 असा फार्म्युला निश्चित असल्याचे समजते. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी 30 टक्के तर सहकारी मित्र पक्षांना 10 टक्के असे जागा वाटप होऊ शकते. असे जरी ठरले असलेतरी अध्यक्ष कुणाचा? यावर मतभिन्नता असू शकते. हातकणंगले जनसुराज्यचा आमदार आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदावर दावा होवू शकतो. परंतू, राष्ट्रवादी आणि भाजपचा येथे लोकप्रतिनिधी नाही. खासदार शिवसेनेचा असल्यामुळं या जागेवरती धैर्यशील माने यांच्या गटाकडून प्रबळ दावेदारी केली जात आहे.
