मलिकवाड दत्तवाड बंधारा पाण्याखाली
एकसंबा / महान कार्य वृत्तसेवा
तळकोकणासह नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. गेल्या पाच सहा दिवसांच्या सततच्या वाढीने दूधगंगा नदी पात्राबाहेर गेली आहे. परिणामी सोमवारी रात्री कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा मलिकवाड – दत्तवाड बंधारा पाण्याखाली गेला.
मान्सूनपूर्व पावसाने गेल्या आठ दिवसापासून दमदार हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केले असताना नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चार-पाच दिवसांपासून कमालीची वाढ दिसून आली. गेल्या काही वर्षात यंदाच मे महिन्यात मलिकवाड दत्तवाड बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या दूधगंगा नदीकाठी शेतकऱ्यांची मोटार पंपसेट काढण्यासाठी तारांबळ उडाली होती. तर दुसरीकडे नदीकाठावर मासे पकडण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
अनेक ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची कामे शिल्लक असताना मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातल्याने बहुतांश कामे ठप्प झाली आहेत.सोमवारी सायंकाळी दूधगंगा पात्राबाहेर पडत शेजारील शिवारामध्ये पाणी शिरल्याने शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली होती. रात्री मलिकवाड दत्तवाड बंधारा ही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा हा पूल वजा बंधारा अनेक कर्मचारी वर्गाला लाभदायक आहे. मात्र त्यांना आता फेरा मारून जावे लागत आहे.
पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन ही अलर्ट मोडवर आले असून अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून सतर्कतेचा इशारा देत आहे.
