पेठवडगाव बाजार समितीचं अक्षम्य दुर्लक्ष
पेठवडगाव विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
पेठवडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात पावसामुळे अक्षरश: दैना उडाली आहे. सोमवारच्या बाजारात गुडघाभर चिखल आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे जनावर खरेदी-विक्रीसाठी आलेल्या व्यापारी शेतकऱ्यांना अक्षरश: कसरत करावी लागली. बाजार समितीने केवळ वसुलीकडे अधिक लक्ष न देता प्राथमिक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.
पेठवडगावमध्ये दुय्यम बाजार हा जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे. मिरज, सांगोला, बाजारभोगावनंतर सर्वात मोठा बाजार म्हणून या जनावरांच्या बाजाराकडे पाहिलं जातं. जवळपास 1 कोटीहून अधिक रुपयांची प्रत्येक सोमवारी केवळ जनावरांच्या खरेदी-विक्रीतून उलाढाल होते. या व्यवहाराच्या करापोटी बाजार समितीला मोठा महसूल मिळतो. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं वडगाव परिसरातील 25 ते 30 खेड्यातील शेतकरी जनावर विक्रीसाठी घेवून येतात. तर जनावरे खरेदीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई येथून व्यापारी वर्ग येत असतो. बैल, भाकड जनावरे, शेळ्या, मेंढ्या याची मोठी उलाढाल या निमित्ताने होते. त्याबरोबर जनावरांना लागणारा चारा, शेतीसाठी लागणारी अवजारे, जनावरांना बांधण्यासाठी दोर आदी साहित्य विक्रीसाठीसुध्दा व्यावसायिक येत असतात.
या सर्वांची पाणी, स्वच्छतागृह याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची बाजारसमितीची जबाबदारी. परंतू, या सर्व सुविधांचा याठिकाणी अभाव दिसतो. सोमवारी बाजारादिवशी पाऊस पडल्यामुळे आवारात प्रचंड चिखल झाला होता. गुडघाभर चिखलात जनावरे उभा करुन व्यापार करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. रस्त्यावर सुध्दा चिखल साचल्यामुळे वाहनधारकांनाही जनावरे भरून घेवून जाण्यासाठी कसरत करावी लागली. ठिकठिकाणी शेणाचे ढिग साचले होते. प्रवेशद्वारापासूनच उग्र दुर्गंधी आणि चिखलातून वाट काढत कसरत करताना पहायला मिळाली. तर बाजाराच्या दक्षिण बाजूस झाडे-झुडपे वाढलेली आहेत. त्याची साफसफाई केलेली नाही. तर मुख्य इमारतीच्या पाठीमागे पुर्वेकडील बाजूस कचऱ्याचा खच पडलेला आहे. अनेक नागरि सुविधा याठिकाणी नाहीत. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. सध्या पावसाळा सुरू आहे. किमान सखल भागात मुरूमीकरण करुन तात्पुरती का होईना गैरसोय दूर करावी, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
