मिरज / महान कार्य वृत्तसेवा
मिरज तालुक्यातील विजयनगर येथे बंद बंगला फोडून 5 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 25 हजाराची रोकड लंपास करण्यात आल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी दिली. विजयनगर म्हैसाळ येथे अज्ञात चोरट्यानी बंद घर फोडून 5 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 25 हजार रुपयांची रोकड असा जवळपास 4 लाखांचा ऐवज लंपास केला.
अधिक माहिती अशी की विजयनगर येथील गंगुबाई मारुती शिंदे व त्यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी त्यांच्या बंद घराचे कुलूप कडी कोयंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 5 तोळे सोने व 25 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केला. सदरची घटना सोमवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी चोरीची माहिती शिंदे कुटुंबियांना याबाबतची कल्पना दिली. दरम्यान सलगरे येथे राहणारे त्यांचे मावस भाऊ अनिल कांबळे हे घटनास्थळी येऊन याबाबतची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी करून माहिती घेतली.
दरम्यान ग्रामीण भागात बंद घरे फोडण्याचे सत्र अज्ञात चोरट्याकडून पुन्हा सुरू झाले असून पोलीस प्रशासनाकडून अशा घरफोड्या चोऱ्याना आळा घालण्यासाठी तात्काळ चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
