महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले
वेगावर नियंत्रण आणि योग्य उपाययोजनांची गरज : एस. एम. वाघमोडे
करवीर / महान कार्य वृत्तसेवा
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा दरम्यान सुरू असलेल्या सहा पदरीकरणाच्या कामामुळे पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. विशेषतः तिसऱ्या लेनचे अपूर्ण काम, उंच-सखल रस्त्याची रचना, साचणारे पाणी आणि वाहनचालकांचा अतिवेग हे अपघातांचे मुख्य कारण ठरत आहेत.
अपघातांचे कारण – अपूर्ण लेन, पाणी साचणे आणि अति वेग
सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. दुसऱ्या व तिसऱ्या लेनच्या दरम्यान जवळपास एक ते दीड फूट खोल फरक असून, या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या खोलगट भागांचा अंदाज न आल्याने ट्रक, ट्रॅव्हल्स, बसेससारखी अवजड वाहने पाण्यात अडकून उलटत आहेत.
गोकुळ शिरगाव परिसरात गेल्या आठवड्यातच चार गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये एक एसटी बस, एक ट्रॅव्हल बस, जनावरांनी भरलेला टेम्पो आणि चार वाहनांचा साखळी अपघात यांचा समावेश आहे.
वेगावर नियंत्रण – वाहनधारकांची जबाबदारी
महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे रस्ते अरुंद, निसरडे आणि अनेक ठिकाणी उघडे व अपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत अतिवेग हा थेट मृत्यूला आमंत्रण देणारा घटक ठरत आहे.
1. रस्त्याचा अंदाज येत नाही: उंच-सखल रस्ता, पाण्याने भरलेले खड्डे आणि अपूर्ण कामामुळे मार्ग स्पष्ट दिसत नाही. अति वेगात चालविल्यास वाहनाला ताब्यात ठेवणे अशक्य बनते.
2. ब्रेक लावण्यास विलंब: पावसाळ्यात ब्रेकचा परिणाम मंदावतो. वेग अधिक असल्यास अपघात टाळणे कठीण होते. गाडीवर कंट्रोल न राहिल्यामुळे तीव्र उताराच्या ठिकाणीही अपघाताची शक्यता वाढते.
3. वळणांवर धोका वाढतो: अनेक ठिकाणी डायव्हर्जन असून तिथे स्पष्ट फलक नसल्याने वाहन अचानक वळवावे लागते – वेगात असताना हे फारच धोकादायक ठरते.
4. निसरडा रस्ता: अनेक ठिकाणी मुरूम टाकलेला असून त्यावरून वाहन घसरण्याची शक्यता अधिक आहे.
“सध्या महामार्गावर सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. अशावेळी पावसाळ्यात वाहनांचा वेग अत्यंत मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. अतिवेगामुळे वाहनांना रस्त्याचा अंदाज लागत नाही आणि अपघात घडतात. वाहनधारकांनी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सूचनांचे पालन करावे,”
– सत्यजित घुले सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस मदत केंद्र, उजळाईवाडी
महामार्ग प्राधिकरणाकडून गरजेच्या उपाययोजना:
स्पष्ट फलक व संकेतचिन्हांची गरज: अपघात प्रवण भागात दिशादर्शक फलक, वॉर्निंग बोर्ड आणि रिफ्लेक्टर लावणे.
जलनिकासी यंत्रणा सक्षम करणे: पाणी साचू नये यासाठी तात्काळ ड्रेनेज यंत्रणा उभारणे.
सतत देखरेख व पेट्रोलिंग: रात्रीच्या वेळी विशेष पोलिस बंदोबस्त आणि मोबाइल पेट्रोलिंग.
वाहतूक नियंत्रण कक्ष: अपघाताच्या घटनांवर तात्काळ प्रतिसाद देणारे नियंत्रण केंद्र सुरू करणे.
राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम रोडवे सोलुशन ही कंपनी करत असून, या कंपनीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ब्रिज अर्धवट आहेत. रखडलेल्या कामामुळे महामार्गावर अपघात वाढले असून, यामध्ये काही जणांचा मृत्यू होऊन संसार उध्वस्त झाले आहेत. याची प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर सहा पदरीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.
– उत्तम आंबवडे , सरपंच, उजळाईवाडी
