यड्राव / महान कार्य वृत्तसेवा
ग्राहकांच्या परवानगीशिवाय महावितरणकडून स्मार्ट मिटर बसवले जात असल्याच्या निषेधार्थ यड्राव ग्रामस्थांच्या वतीने महावितरणच्या यड्राव पार्वती औद्योगिक वसाहतीतील कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मिथून बिरांजे आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस औरंग शेख यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अमल नायकवडे यांना निवेदन देण्यात आले.
कोणतीही पूर्वसूचना न देता आणि ग्राहकांची परवानगी न घेता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने स्मार्ट मिटर बसवले आहेत. यामुळे ग्राहकांच्या विजबिलात मोठी वाढ होऊन 600 ते 700 रुपयांच्या सुमाराचे मासिक बिल आता तब्बल 2000 रुपये किंवा त्याहून अधिक येत आहे. ही स्पष्टपणे ग्राहकांची फसवणूक असून एकप्रकारची लूट असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
महावितरणकडून बसवले गेलेले स्मार्ट मिटर त्वरित काढून, त्याऐवजी जुनेच मिटर पुन्हा बसवावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. स्मार्ट मिटरमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत असून, यामागे कोणता गैरव्यवहार आहे का, याची चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सागर वाघमारे, अजय बिरांजे, शेहनशाह सांगावकर, दस्तगीर कोतवडेकर, अल्ताफ हिप्परगी, सुरज शेख, अल्ताफ देसाई, सलीम सय्यद यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या भावना तीव्र असून, लवकरात लवकर योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
