Spread the love

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे रविवारी रात्री नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल आणि विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, आ.आशिष देशमुख, आ.चरणसिंग ठाकूर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर भाजप शहरच्या वतीने अमित शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. परंतु या सोहळ्याला शहरातील संपूर्ण भाजपचे नेते उपस्थित असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलेली आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांचा रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम होता. या हॉटेलच्या अगदी बाजूला गडकरी यांचे निवासस्थान आहे. असे असतानाही दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये कुठलीही भेट झाली नाही. हा दुरावा अनेक प्रश्न उपस्थित करून गेला आहे.

शाह यांच्या उपस्थितीत सोमवारी नागपुरात महत्त्वाचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथील ‘स्वस्ति निवास’ या निवासी इमारतीचे भूमिपूजन तसेच, चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

मोदींच्या उपस्थितीतही झाला होता असाच प्रकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विमानतळावर शाह यांचे स्वागत केले. त्यानंतर भाजपच्या वतीने हेडगेवार चौकात फुलांचा हार घालून शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्वागत केले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात उपस्थित सर्वांमध्ये उत्साह होता.

आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, संदीप जोशी, डॉ.उपेंद्र कोठेकर, संजय पांजे, माजी आमदार डॉ.मिलिंद माने, सुधाकर कोहळे उपस्थित होते. संपूर्ण हेडगेवार चौक परिसरात भारत माता की जय, भारतीय जनता पार्टी चा विजय असो, या घोषणांनी दणाणून सोडला. मात्र या सर्वांचे उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती सर्वत्र चर्चेच्या विषय ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपुरात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमातही नितीन गडकरींना मोदींसमोर भाषण करू दिले नव्हते हे विशेष.