Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या नेत्यांना त्यांच्या सार्वजनिक भाषणांमध्ये संयम बाळगण्याचा आणि अनावश्यक भाष्य करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. एनडीए-शासित राज्यांमधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंर्त्यांच्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी पक्षातल्या नेत्यांच्या विधानांबाबत चिंता व्यक्त केली. अलीकडेच एनडीएच्या काही नेत्यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल केल्या गेलेल्या ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली गेली होती. ”भाषण करताना स्वत:वर संयम ठेवा आणि अनावश्यक विधाने करणे टाळा, असे पंतप्रधान मोदींनी बैठकीत उपस्थितांना सांगितले.

गेल्या महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपा नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. त्या नेत्यांमध्ये मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा व राज्यमंत्री विजय शाह यांचा समावेश आहे. त्याच पार्श्‌‍वभूमीवर पंतप्रधान मोदींनी हा सल्ला नेत्यांना दिला आहे.

एनडीएच्या नेत्यांची विधानं

जगदीश देवडा यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या विधानामुळे प्रचंड राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये देवडा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत वक्तव्य केले होते. जबलपूर येथे नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना देवडा यांनी म्हटले होते, ”भारतीय सैन्य आणि सैनिकांसह संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक होत आहे.” मध्य प्रदेशचे आदिवासी व्यवहारमंत्री कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतरदेखील राजकीय वाद निर्माण झाला होता.

”जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाडेष्ठ हमने उन्हीं की बहन को भेज कर उनकी ऐसी की तैसी करवा दी” ज्यांनी आमच्या मुलींच्या कपाळावरचे सिंदूर पुसलेष्ठ आम्ही त्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्याच बहिणीला पाठवले, असे वक्तव्य शाह यांनी केले होते. मंत्री शाह यांनी एका सभेत बोलताना कुरेशी यांचा उल्लेख ‘दहशतवाद्यांची बहीण’, असा केला होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीका करण्यात आली. विजय शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नंतर माफी मागितली होती. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांची माफी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. मगरीचे अश्रू ढाळू नका, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने विजय शाह यांना खडे बोल सुनावले होते. सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. हा आदेश रद्द करण्याची विनंती विजय शाह यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणी माफी मागितली आहे वगैरे सांगत मगरीचे अश्रू ढाळू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.