मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यानंतर प्लेऑफचे सामने आणि अखेरीस अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अशातच आयपीएलचा समारोप समारंभ भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केले आहे की, आगामी आयपीएल 2025 चा समारोप समारंभात ऑपरेशन सिंदूर’च्या हिरोंचा सन्मान केला जाणार आहे.
आगामी आयपीएल 2025 चा समारोप समारंभ हा 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तेथेच आयपीएलचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने दहशतवादी तळांविरुद्ध केलेल्या यशस्वी कारवाईचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा असणार आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, बीसीसीआयच्या वतीने आम्ही आमच्या शूर सैनिकांच्या शौर्य, धाडस आणि नि:स्वार्थ सेवेला सलाम करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य देशालाही सुरक्षित ठेवते आणि आपल्या सर्वांना प्रेरणाही देते. या सन्मानार्थ, आम्ही आयपीएल 2025चा समारोप समारंभ सैन्याला समर्पित करण्याचा आणि आमच्या सैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा सर्वप्रथम महत्त्वाची आहे. क्रिकेट हा देशाचा आवडता खेळ आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना यामार्फत सन्मानित करणार आहोत.
