मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
भारतीय शेअर बाजारात आज सकाळी व्यवहार सुरू होताच तेजी पाहायला मिळाली आहे. दोन्ही प्रमुख निर्देशांक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व निफ्टीवर हिरवा कंदील पाहून गुंतवणूकदार सुखावले आहेत. दोन्ही निर्देशांक सकाळपासून तेजीत व्यवहार करत आहे. बीएसई निर्देशांकाने 650 अंकांची उसळी घेतली आहे. याद्वारे निर्देशांक 82,300 च्या पुढे केला आहे. तर निफ्टी 50 हा 175.7 अंकांनी वधारून 25,028 वर पोहोचला आहे.
जपानला मागे टाकून भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाने रविवारी याबाबतची माहिती जाहीर केली. त्याचा शेअर बाजारावर चांगाल परिणाम झाला असल्याचं या क्षेत्रातीत तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन महासंघावरील परस्पर आयात शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) वाढवण्याचा इशारा दिला होता. मात्र, याबाबतचा निर्णय जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. याचा जागतिक बाजारावर चांगला परिणाम दिसत आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराने देखील उसळी घेतली आहे.
नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुबह्मण्यम यांनी रविवारी (24 मे) प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत.
बीएसई सेन्सेक्स वधारल्यामुळे महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा मोटर्स, टायटन, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एनटीपीसी, पॉवर ग्रिड व बजाज फिनसर्व या कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. याचबरोबर बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, बजाज होल्डिंग्स, नेस्टले इंडिया, आयआरएफसी, अदानी पॉवर, कल्याण ज्वेलर्स, पेटीएम, माझगाव डॉक, एमआरएफ, हिंदुस्तान पेट्रोलियम, भेल या कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. आशिया खंडातील प्रमुख शेअर बाजारांबद्दल बोलायचं झाल्यास दक्षिण कोरियाचा कॉस्पी व जपानचा निक्की निर्देशांक देखील वधारला आहे. तर हाँगकाँगचा हेंगसेंग व शांघायच्या (चीन) कम्पोजिटची घसरण झाली आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकन शेअर बाजाराची देखील घसरण झाली आहे.
