सोलापूर / महान कार्य वृत्तसेवा
मागील दोन दिवसांपासून भीमा आणि निरा खोऱ्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी ओढे अन् नाले वाहू लागलेत. निरा खोऱ्यात दमदार पाऊस पडल्याने वीर धरणातून निरा नदीमध्ये 26,525 क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे अकलूज येथील संगम या ठिकाणी निरा नदी काल रात्री 10 वाजता सुमारे 30 हजार क्युसेक वेगाने वाहत होती. संगम मार्गे निरा नदी ही पुढे भिमा नदीला मिळते. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत सध्या मोठ्या प्रमाणावर वाढ झालीय. भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे असणारे बंधारे आज सकाळी पाण्याखाली गेलेत. भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली : निरा खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने कालच प्रशासनाने या बंदरावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्यात. तसेच महावितरणाच्या वतीने ही दुर्घटना टाळण्यासाठी तसेच कृषिपंप काढण्यासाठी नदीकाठचा काही भागातील विद्युत पुरवठाही बंद ठेवण्यात आला आहे. निरा नदीतील या पाण्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा वाळवंटातील मंदिरालाही पुराच्या पाण्याने वेढा दिला असून, काही मंदिरे पाण्याखाली गेलीत.
उजनी धरणामधील पाणीसाठ्यात वाढ : तसेच पुणे जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणांमध्येसुद्धा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढत असून, आज सकाळी सहा वाजताच्या मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरणांमध्ये जवळपास 18 हजार क्युसेक्स इतका विसर्ग येत असून, उजनी धरणाची पाणी पातळी ही वजा 7.72 टक्के भरली आहे. लवकरच उजनी धरणातल्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.
