सावधान! तुमच्याजवळची 500 रुपयांची नोट खोटी तर नाही ना?
धुळे / महान कार्य वृत्तसेवा
बनावट नोटा व्यवहारात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. धुळे शहरातील पेट्रोल पंपावर एकजण नेहमी बनावट नोटा देवून पंपचालकाची फसवणूक करत होता. हा प्रकार लक्षात आल्यानं त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलं. यावेळी सदर व्यक्तीकडं 12 हजार 500 रुपये किंमतीच्या पाचशेच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यामुळं पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याची चौकशी सुरू केली.
पंपावर करायचा नोटांचा वापर : लोकमान्य हॉस्पिटलजवळील एचपी कंपनीच्या पेट्रोल पंपावर एक व्यक्ती बनावट नोटा देवून पंपचालकाची फसवणूक करत होता. पेट्रोल भरल्यानंतर तो बनावट नोटा देवून निघून जात असे. या नोटा मशिनमध्ये मोजल्यानंतर त्या बनावट असल्याचं समोर आलं. यावरुन पंपावरील कर्मचारयांना संशय आला. रोज 500 रुपयांची बनावट नोट नेमके कोण देवून जातो, यावर पंपावरील कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवलं. तसंच याबाबत चाळीसगाव रोड पोलिसांनाही माहिती दिली.
500 रुपयांच्या बनावट नोटा : संबंधित व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आल्याची माहिती कर्मचान्यानी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना दिली. घुसर यांनी तत्काळ पथकातील कर्मचान्यांसह पेट्रोल पंपावर धाव घेतली. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी रोज येणारा व बनावट नोटा देवून फसवणूक करणान्या संशयिताला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडं 12 हजार 500 रुपये किंमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.
संशयिताची कसून चौकशी सुरू : पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, तो वडजाई रोडवरील काझी प्लॉट गफुर नगरातील रहिवासी असून, नागिर अब्दुल सत्तार (41) असं त्याचं नाव असल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलीस अनिलेश बोरसे यांच्या तक्रारीवरून नासिर सत्तार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे करत आहेत.
बनावट नोटा चलनात : शहरातील पेट्रोल पंप, हॉटेल्स अशा ठिकाणी बनावट नोटा खपवून त्या चलनात आणल्या जात असल्याचा प्रकार यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आलाय. त्यामुळं नागरिकांनी पाचशेच्या नोटा घेताना खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. पोलिसांनी नागिर सत्तार याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरु केली आहे. बनावट चलन प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत, यासाठी पोलिसांकडून काही लोकांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
