मिरज / महान कार्य वृत्तसेवा
मिरज येथील वानलेस मिशन हॉस्पिटल उद्घाटनाने कार्यक्रमावेळी आरोपी प्रकाश पांडुरंग पाटील वय 29 वर्ष व्यवसाय फोटोग्राफर राहणार कवठेएकंद ता.तासगाव याने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा अधिकारी सांगली यांनी सांगली जिल्हा स्थल सीमा हद्दीमध्ये दिनांक 16 मे 2025 ते 03. जून 2025 या कालावधीत ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र उडवण्यास मनाई आदेश जारी केलेला असताना सदर आदेशाचा भंग करून आज 25 मे 2025 रोजी सकाळी 11.30 वाजण्याचे सुमारास वानलेस (मिशन ) हॉस्पिटल मिरज येथे सार्वजनिक ठिकाणी त्याच्या ताब्यातील ड्रोन बेकायदा बिगर परवाना हवेत उडवत असताना बंदोबस्तावरील मिरज शहर पोलीस स्टेशनकडील पोलिसांना मिळून आला आहे.
सदर इसमास व त्याच्या ताब्यातील 50000 रुपये किमतीचा एक डीजेआय कंपनीचा ए आय आर 3 मॉडेलचा ड्रोन कॅमेरा पोलिसांनी जप्त केला असून, बेकायदेशीर ड्रोन उडविणाऱ्या प्रकाश पाटील याचे विरुद्ध गुन्हा नोंद झालेला असून मिरज शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार दत्तात्रय रामचंद्र फडतरे यांनी फिर्याद दिलेली आहे.
सदरची कारवाई मिरज शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव, पोलीस हवालदार झाकीर काजी, पोलीस शिपाई दत्तात्रय फडतरे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विनायक ऐवळे हे करीत आहेत.
