शेख हसीना यांचा मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाल्या, ”बांगलादेशष्ठ”
दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा समोर आली होती. या मागचं कारण म्हणजे बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी येत्या डिसेंबरपर्यंत अंतरिम सरकारला निवडणुका घेण्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर मोहम्मद युनूस यांनी एक प्रकारे राजीनामा देण्याची धमकी दिली आणि त्यानंतर बांगलादेशात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरु झाली.
यानंतर मोहम्मद युनूस यांनी आपल्या अंतरिम सरकारमधील सर्व सल्लागारांची बैठक घेत चर्चा केली. त्यानंतर अंतरिम सरकारमधील सल्लागारांनी मोहम्मद युनूस हे राजीनामा देणार नसून ते पदावर कायम राहतील असं सांगितलं. दरम्यान, मोहम्मद युनूस हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनंतर आता देशभरात पुन्हा एकदा निदर्शने सुरु झाल्याचं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘मोहम्मद युनूस यांनी दहशतवाद्यांच्या मदतीने बांगलादेशात सत्ता काबीज केली, आता ते बांगलादेश अमेरिकेला विकत आहेत’, असा गंभीर आरोप शेख हसीना यांनी केला आहे.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी काय म्हटलं?
”मोहम्मद युनूस यांनी दहशतवाद्यांच्या मदतीने बांगलादेशात सत्ता काबीज केली. यातील अनेक दहशतवादी संघटना अशा आहेत की त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्थरावर बंदी आहे. तसेच मोहम्मद युनूस हे दहशतवाद्यांच्या मदतीने सरकार चालवत आहेत. तसेच मोहम्मद युनूस हे देश (बांगलादेश) अमेरिकेला विकत आहेत”, असे गंभीर आरोप शेख हसीना यांनी मुहम्मद युनूस यांच्यावर केले आहेत.
वृत्तानुसार, शेख हसीना यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, ”जेव्हा अमेरिकेला सेंट मार्टिन बेट हवं होतं, तेव्हा माझे वडील सहमत नव्हते. त्यांना आपला प्राण गमवावा लागला. सत्तेत राहण्यासाठी देश विकण्याचा विचार मनात देखील कधी आला नाही आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिला, शस्त्रे उचलली, लढले आणि 30 लाख लोकांना मुक्त करण्यासाठी त्यांनी आपले प्राण दिले. त्या देशाची एक इंचही जमीन कोणालाही देण्याचा कोणाचा हेतू नसेल. मात्र, आज किती मोठं दुर्दैव आहे”, असे शेख हसीना यांनी म्हटले आहे.
आज युनूस बांगलादेश अमेरिकेला विकत आहे. मोहम्मद युनूस यांना देशावर प्रेम होतं, पण ते सत्तेत आल्यानंतर ते बदलले. त्यांनी दहशतवाद्यांच्या मदतीने सत्ता काबीज केली, सर्व दहशतवाद्यांना अगदी विविध आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बंदी असलेल्यांनाही ज्यांच्यापासून आम्ही बांगलादेशच्या लोकांना संरक्षण दिले होते. एका दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही कठोर पावले उचलली होती, अनेकांना अटक करण्यात आले होते. पण आज तुरुंग रिकामे झाले आहेत, त्या सर्वांना सोडले आहे”, असंही शेख हसीना यांनी म्हटलं आहे.
अवामी लीगवरील बंदीवर शेख हसीना काय म्हणाल्या?
”बंगाली राष्ट्राचे संविधान दीर्घ संघर्ष आणि मुक्ती युद्धातून मिळाले. पण बेकायदेशीरपणे सत्ता काबीज करणाऱ्या या नेत्याला संविधानाला स्पर्श करण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांना जनतेचा जनादेश नाही, कोणताही संवैधानिक आधार नाही. त्या पदाला (मुख्य सल्लागार) देखील कोणताही आधार नाही आणि ते अस्तित्वात नाही. मग संसदेशिवाय ते कायदा कसा बदलू शकतात? हे बेकायदेशीर असून त्यांनी अवामी लीगवर बंदी घातली आहे”, असे शेख हसीना यांनी म्हटले आहे.
