Spread the love

भाविकांच्या सोयीसाठी सुविधांचा अभाव ; सरपंच विजय गुरव यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

सरवडे / महान कार्य वृत्तसेवा

सरवडे (ता.राधानगरी) नजिकच्या आदमापूर गावातील श्री सदगुरु बाळूमामा देवालय हे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. बाळूमामांच्या पवित्र चरित्रामुळे आणि त्यांच्या बकऱ्यांचा चमत्कारिक अनुभव घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक आदमापूर येथे दर्शनासाठी गर्दी करत आहेत. मात्र या ठिकाणी अद्ययावत सुविधा नसल्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेता या तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याची मागणी आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी केली आहे.

सरपंच गुरव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करताना नमूद केले की, “श्री बाळूमामा यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आदमापूर येथील देवस्थान परिसरात भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सध्याच्या स्वरूपात देवस्थान व्यवस्थापनास उपलब्ध असलेल्या प्राथमिक सोयी सुविधा अपुऱ्या असून, भाविकांना पिण्याच्या पाण्याची, निवासाची, स्वच्छतागृहांची, रस्त्यांची व पार्किंगसारख्या मूलभूत गोष्टींची मोठी कमतरता भासत आहे.”

निवेदनातील प्रमुख मागण्या:

अन्नछत्राची उभारणी व व्यवस्थापन

मोठ्या प्रमाणावर भक्तनिवासांचे बांधकाम

सुसज्ज रस्ते, दिव्यांची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याचे टँक

आधुनिक स्वच्छतागृहे व स्नानगृह

वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा

दर्शनासाठी सुसंगत रांग व्यवस्था

मंदिर परिसरात दुकानगाळ्यांची उभारणी

बाळूमामांचे वास्तव्य असलेला श्री मरगुबाई मंदिर परिसर देखील भक्तांनी गजबजलेला असून तिथेही योजना राबवाव्यात

गाव डोंगरावर असलेल्या विठूबाई मंदिराचा पर्यटनदृष्ट्या विकास

विकासाचा व्यापक दृष्टीकोन गरजेचा

भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू असलेल्या या देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देऊन निधीची तरतूद करावी, असेही गुरव यांनी म्हटले आहे. बाळूमामा हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून दक्षिण भारतातील अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर विकासाचे नियोजन होणे आवश्यक आहे.

शासनाच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा

सरपंच गुरव यांच्या निवेदनाने परिसरातील ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि भाविकांमध्ये आशा निर्माण केली आहे. शासनाने लवकरात लवकर या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर करावा, अशी भाविकांची एकमुखी मागणी आहे.