Spread the love

अमरावती / महान कार्य वृत्तसेवा

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका तरुणाची लग्नाच्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर वधूच्या प्रियकराने केल्याचं तपासातून समोर आलं आहे. मयत तरुणाचं प्रेयसीसोबत लग्न होत असल्याच्या रागातून ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दयाराम वरठी असं अटक केलेल्या 34 वर्षीय आरोपी प्रियकराचं नाव आहे. तो मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर धरमू मयतीलाल उईके असं हत्या झालेल्या 24 वर्षीय नवरदेवाचं नाव आहे. मयत धरमू याचा 23 मे रोजी मध्य प्रदेशातील एका युवतीसोबत विवाह ठरला होता. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पाहुण्यांनी घरी यायला सुरुवात झाली होती. दरम्यान लग्नाच्या आदल्या दिवशी गुरुवारी धरमू अचानक घरातून गायब झाला. तो कुठे गेला, कुणासोबत गेला? याची काहीच कल्पना घरच्यांना नव्हती.

लग्नाच्या आदल्या दिवशी गूढ पद्धतीने मुलगा धरमू गायब झाल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही धरमूचा शोध घेतला, पण त्यांनाही धरमूचा पत्ता लागला नाही. अखेर ऐन लग्नाच्या दिवशी अमरावतीच्या शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील कवठाळ शेत शिवारातील एका विहिरीत धरमूचा मृतदेह आढळला. त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचं दिसून आलं. विहिरीच्या बाजुला हत्या करण्यासाठी वापरलेला दगडाने माखलेला दगडही आढळून आला. या घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली अन्‌‍ अवघ्या तीन तासात नराधम आरोपी दयाराम वरठीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वरठी याचे धरमूच्या होणाऱ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. याच रागातून दयारामने लग्नासाठी फटाके आणण्याच्या बहाणा केला. त्यासाठी धरमूल दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं. याठिकाणी आरोपीनं दगडाने ठेचून नवरदेवाची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.