पुणे / महान कार्य वृत्तसेवा
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता एका नव्या आरोपीचा सहभाग समोर आला असून, पुणे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी कंबर कसली आहे. हगवणे कुटुंबीयांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंड निलेश चव्हाणचाही सहभाग असल्याचा आरोप हगवणे कुटुंबियांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन पथके निलेश चव्हाणचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता निलेश चव्हाण याचा शस्त्रपरवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात आयजी जालिंदर सुपेकर यांचं नाव देखील समोर आलं आहे.
निलेश चव्हाणला शस्त्रपरवाना कसा मिळाला?
निलेश चव्हाणवर 2019 जून महिन्यात गुन्हा दाखल असताना ही नोव्हेंबर 2019 महिन्यात निलेश चव्हाणला पुणे पोलिसांनी शस्त्रपरवाना दिला होता. जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं उघड झालंय. गुन्हा दाखल असताना दबावाने परवाना मिळवून दिल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येतंय.
वैष्णवी मृत्यू मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक न करण्यासाठी , पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर दबाव आणत असल्याचा अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा केला होता. तसेच राजकीय वर्तुळातून देखील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
कस्पटे परिवाराने आरोप केला होता की, निलेश चव्हाणने वैष्णवीचं लहान बाळ बंदुकीचा धाक दाखवून देण्यास नकार दिला होता. या गंभीर आरोपानंतर त्याच्याविरुद्ध पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेपासून निलेश चव्हाण फरार आहे.
मध्यरात्री घरावर छापा आणि जप्ती
निलेश चव्हाण अद्यापही फरार असल्याने, पुणे पोलिसांनी काल (गुरुवारी) रात्री उशिरा त्याच्या घरावर छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी निलेश चव्हाणला पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीसही बजावली आहे.
वडील आणि भाऊ चौकशीसाठी ताब्यात
या कारवाईदरम्यान, पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या वडिलांना आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. निलेश चव्हाण नेमका कुठे आहे आणि त्याचा हगवणे कुटुंबीयांशी नेमका काय संबंध आहे, या संदर्भात पोलीस त्यांची कसून चौकशी करणार आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची भूमिका यापूर्वीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. आता निलेश चव्हाणचा सहभाग आणि त्याच्यावरील कारवाईमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पुणे पोलीस या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन सर्व आरोपींना गजाआड करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
