मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवून आणणाऱ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक जुळवाजुळव करत असताना आता निधीसाठी सरकारची दमछाक होतेय का? असाच प्रश्न उभा राहत आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे या योजनेसाठी घेण्यात आलेला आदिवासी विकास विभागाचा निधी वळता होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
लाडक्या बहिणींच्या निधीसाठी या विभागातून तब्बल 357 कोटी 70 लाख रुपये वळवण्यात येणार असून, सामाजिक न्याय विभागापाठोपाठ आता आदिवासी विकास विभागाच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाकडून निधी वर्ग केल्याचा जीआर समोर आल्यानं ही बाब समोर आली.
प्राथमिक माहितीनुसार आदिवासी विकास खात्यातून प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार आहे. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे. दरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र निधी वळवल्याच्या बातम्या खोट्या असल्याचंच म्हटलं आहे. मात्र आता शासन या परिस्थितीवर नेमका काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
काय म्हणाले बावनकुळे?
या अशा प्रकारच्या बातम्या पसरवून संभम का निर्माण केला जात आहे हे मला समजत नाही असं म्हणत त्यांनी निधी वळवल्याच्या बातम्या टाळल्या. ‘लाडक्या बहिणीच्या योजनेचं बजेट हेड वेगळं असून आदिवासी समाजाच्या निधीचं बटेज हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे. त्यामुळे इकडचे तिकडे करता येत नाही. लाडक्या बहिणींसाठी सरकारचं वेगळं बजेट आहे, त्यामुळे हा खोटारडेपणा असून काहीतरी कारणानं सरकारचं नाव बदनाम करण्याचं कारस्थान आहे’, असं ते म्हणाले.
दरम्यान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी विभागाची कोणतीही योजना बंद पडणार नसून, या विभागाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कोणत्याही विभागाला निधी कमी पडणार नाही अशी हमी दिली. महायुती सरकार, आदिवासी समाज आणि आदिवासी विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
