Spread the love

बीड / महान कार्य वृत्तसेवा

बीड जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपा नेत्या आणि विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांचा बॅनरवर फोटो टाळत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मुलाचे बीडमध्ये बॅनर लागले आहेत. यश प्रवीण दरेकर केसरी बैलगाडा शर्यतीचे बीडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे.

दरम्यान, बीडमध्ये कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो नाही. त्यामुळं बीड जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे चिरंजीव डॉक्टर यश प्रवीण दरेकर यांचे बीडमध्ये मोठे बॅनर समर्थकांकडून लावण्यात आले आहेत. परंतू, या बॅनरवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे छायाचित्र टाळण्यात आले आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड, चित्रा वाघ यांचे छायाचित्र आहेत. परंतू, पंकजा मुंडे मंत्री असताना आणि बीड जिल्ह्यातील असताना देखील त्यांचे छायाचित्र टाळण्यात आले आहे. डॉक्टर यश दरेकर केसरी बैलगाडा शर्यतीनिमित्त हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून भाजपमधील गटबाजी दिसून येत आहे.अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात राज्यातील विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं जात आहे. विशेष राजकीय नेतेमंडळी अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत असल्याचे दिसत आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यापार्श्‌‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केली आहे. मात्र बीड जिल्हा या निवडीत कुठेच नाही. याला मंत्री पंकजा मुंडे (झ्रहज्ञररर श्ल्ह्‌ा) आणि आमदार सुरेश धस यांच्या वादाची किनार आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.  बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या. मात्र भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात मंडळ अध्यक्ष निवडण्यात आले नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती झाल्यानंतर बीडमध्ये मात्र अध्यक्ष पदाची निवड रखडल्याचे पाहायला मिळत आहे.