Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मनसे युती संदर्भात केले आहे. तर ठाकरे बँड कधी संपणार नाही. ईस्ट इंडिया कंपनी सुरतचे मालक म्हणताय की, जोपर्यंत पवार आणि ठाकरे बँड संपत नाही, तोपर्यंत मुंबई आपल्याकडे घेता येणार नाही. पण मी सांगतो, या देशातून मोदी, फडणवीस, शाह ही नावं पुसली जातील, असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. आमच्याशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झालेली आहे.कालही आम्ही बोललो. आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसासाठी एकत्र येणं हीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मानवंदना ठरेल, असे त्यांनी म्हटले.

आम्ही राज ठाकरेंसोबत नातं जोडायला सकारात्मक

संजय राऊत पुढे म्हणाले की, राज ठाकरेंनी एक मुलाखत दिली, दुसरी मुलाखत दिली म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही. उद्धव ठाकरेंनी सुद्धा एका कार्यक्रमात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि मुलाखतीतून युतीची चर्चा ठरत नाही. राज ठाकरेंच्या मुलाखतीपेक्षा प्रत्यक्षात काय चाललं आहे? हे आम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, आम्ही सगळे राज ठाकरे यांच्यासोबत नातं जोडायला पूर्णपणे सकारात्मक आहोत, असेही त्यांनी सांगितले.

तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. दोघांवरती जनतेचे प्रेशर आहे, जसं भावनिक प्रेशर आहे तसं राजकीय सुद्धा आहे. मुंबईवर जर आपला अधिकार ठेवायचा असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सुरत प्रायव्हेट लिमिटेड, प्रोप्रायटर बाय अमित शाह, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि बाकी शेअर होल्डर्स यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

ठाकरे बँड कधी संपणार नाही

संजय राऊत पुढे म्हणाले की, ठाकरे बँड कधी संपणार नाही. ईस्ट इंडिया कंपनी सुरतचे मालक म्हणताय की, जोपर्यंत पवार आणि ठाकरे बँड संपत नाही, तोपर्यंत मुंबई आपल्याकडे घेता येणार नाही. पण मी सांगतो, या देशातून मोदी, फडणवीस, शाह ही नाव पुसली जातील. त्यांनी देशासाठी काहीच केलं नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भरीव काम केलं आहे. जब तक सुरज चांद रहेगा, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे बँडच राहतील. पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाहीत. त्या नाड्या आमच्या हातात आहेत. पडद्याआड चर्चेच्या पडदा कधी उघडायचा ते दोन भाऊ ठाकरे ठरवतील, असे त्यांनी म्हटले.