Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (गछउअडठ), तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेतील संशोधकांनी सुपर-फास्ट चार्जिंग सोडियम आयन बॅटरी (डखइ) विकसित केली आहे. ही बॅटरी लिथियमऐवजी सोडियमवर आधारित असून, भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देणारी आहे. ही बॅटरी केवळ सहा मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते. या संशोधनामुळं ऊर्जा साठवण तंत्रज्ञानात भारत स्वावलंबी होण्याच्या दिशेनं मोठे पाऊल टाकत आहे.
कॅथोड आणि ॲनोड विकसीत बॅटरी
प्रोफेसर प्रेमकुमार सेंगुत्तुवन आणि पीएचडी विद्याार्थी बिप्लब पात्रा यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी ‘छअडखउजछ-प्रकारच्या’ कॅथोड आणि ॲनोड सामग्रीवर आधारित ही बॅटरी विकसित केली आहे. पारंपरिक सोडियम-आयन बॅटरींना स्लो चार्जिंग आणि कमी आयुष्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो, परंतु या नवीन बॅटरीनं रसायनशास्त्र आणि नॅनोटेक्नॉलॉजीच्या मिश्रणानं ही आव्हाने दूर केली आहेत. संशोधकांनी ॲनोड सामग्रीमध्ये तीन महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत.संशोधकांनी कणांचा आकार नॅनोस्केलपर्यंत कमी केला असून त्यावर पातळ कार्बनचा थर चढवला आहे. नंतर त्यांनी ॲनोड सामग्रीत थोड्या प्रमाणात ॲल्युमिनियमचा समावेश केला. या बदलांमुळं सोडियम आयनांची गतिशीलता वाढलीय. त्यामुळं बॅटरी अधिक सुरक्षित आणि टिकाऊ बनलीय.
सुरक्षित बॅटरीला महत्व
जगभरात विद्युतीकरणाची स्पर्धा सुरू आहे. यात स्वस्त, जलद आणि सुरक्षित बॅटरीला महत्व आहे. लिथियम-आयन बॅटरी सध्या प्रचलित असल्या तरी त्या महागड्या असून लिथियम संसाधने मर्यादित आहेत. बेंगळुरूच्या संशोधकांनी याला पर्याय म्हणून सोडियम-आयन बॅटरी विकसित केली आहे, जी इलेक्ट्रिक वाहनं, सौर ग्रीड, ड्रोन आणि ग्रामीण भागांपर्यंत स्वच्छ ऊर्जा पोहोचवू शकते.

जलद चार्जिंग
या तंत्रज्ञानाची उच्चस्तरीय पद्धतींनं चाचणी करण्यात आली आहे. ही बॅटरी जलद चार्जिंगलाच समर्थन देत असून पारंपरिक बॅटरींना खराब होणारे धोकेही टाळतेय. ही बॅटरी बाजारात येण्यापूर्वी आणखी तिला विकसीत करण्याची गरज असली तरी, हा शोध भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.