तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर यांची माहिती
जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी दिली आहे.
संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसील प्रशासनाने आरोग्य विभागाच्या पूर परिस्थितीत नागरिकांची काळजी घेण्यासाठी बैठका घेतल्या असून शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त 42 गावांमध्ये 42 आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.
पूर परिस्थितीच्या वेळी नागरिकांना औषधाचा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी सैनिक टाकळी, कवठेगुलंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व पंचायत समिती शिरोळ अशा तीन ठिकाणी औषधाचा बफर स्टॉक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण झाले आहे. यामध्ये पूर्वतयारी कशी करावी, औषधे कोणती सोबत असली पाहिजे यासह प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साथरोग किट अद्यावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीना तीन महिने पुरेल एवढा टीसीएल साठा व मेडिक्लोर उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
पूर परिस्थिती दरम्यान नळ पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद पडल्यास बोरवेल किंवा विहिरीमध्ये टीसीएल पावडर टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जेणेकरून नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळेल 42 गावांमध्ये छावण्या असणार असून यामध्ये 168 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत तालुक्यातील आठ प्राथमिक केंद्रामध्ये तीन महिने पुरेल एवढा औषध साठा उपलब्ध ठेवण्यास सांगितले आहे.
शिरोळ तालुक्यामध्ये दोन ग्रामीण रुग्णालय एक जिल्हा परिषद दवाखाना तसेच दोन आयुर्वेदिक दवाखाने आहेत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळामध्ये गरोदर असलेल्या मातांना पत्र देण्यात आले असून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना स्थलांतरित होण्यासाठी सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णांना कायमस्वरूपी गोळ्या सुरू आहेत. तसेच दिव्यांग आहेत अशांना जे औषध चालू असते त्या औषधाची चिठ्ठी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचे कडे देण्यास सांगितले आहे. जेणेकरून पूर परिस्थिती वेळी छावणी मध्ये गेल्यानंतर औषधाची चिठ्ठी विसरली असल्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्याकडे असणाऱ्या चिट्टीद्वारे त्यांना औषध पुरवठा करण्यात येणार आहे. एकंदरीत संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग खटावकर यांनी दिली आहे.
