Spread the love

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून तीव्र सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी तातडीने बैठक आयोजीत केली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. परंतु या बैठकीला महाविकास आघाडीतील विद्यमान लोकप्रतिनिधींना पद्धतशीरपणे डावलण्यात आले आहे. यामागील नेमके राजकारण काय असू शकते. याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास कोल्हापूर जिल्ह्यातून उठाव झाला. यास सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींनीही साथ दिली.

आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनाची धुरा उचलली. माजी खासदार राजू शेट्टी ही अग्रभागी होते. नुकत्याच अंकलली पुलावर झालेल्या आंदोलनात सत्ताधारी महायुतीमधील आ. राहूल आवाडे, डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या व्यथीरिक्त महायुतीमधील एकही नेता या आंदोलनाकडे फिरकला नाही. मात्र बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, राहूल आवाडे, राजेश क्षीरसागर, विनय कोरे, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सदाभाउ खोत, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, राजेंद्र पाटील, सुहास बाबर, इंद्रीस नायकवडी, पाटबंधारेचे कार्यकारी संचालक यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.महाविकास आघाडीचे खासदार श्रीमंत शाहू महाराज, आ.सतेज पाटील, खा.विशाल पाटील, आ. अरुण लाड, जयंत आसगावकर, विश्वजीत कदम यांना बैठकीपासून अलिप्त ठेवण्यात आले आहे.