Spread the love

हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

उन्हाळा जवळपास संपलाच का अशी परिस्थिती सध्या आहे. कुठे ढगाळ तर कुठे अति मुसळधार पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. उष्ण आणि दमट वातावरणामुळे घामाघून होत असलं तरी संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. सध्या राज्यात प्री मान्सूनची स्थिती निर्माण झाल्याने आठवडाभर पाऊस राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेआधीच अंदामान निकोबारहून पुढे सरकत आहे.

मान्सून यंदा 5 दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्रातील हवामान एका वेगळ्या वळणावर आहे. मे महिन्याच्या मध्यातच मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं असून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आणि विशेषत: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नवीन अपडेटनुसार, यंदा मान्सून वेळेपेक्षा 5 दिवस लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनने 13 मे रोजीच अंदमान आणि निकोबार बेटांवर हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. यामुळे आता महाराष्ट्रातही लवकरच पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. घ्श् च्या अंदाजानुसार, 27 मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, तर 1 जून ते 5 जून या दरम्यान तो कोकणात दाखल होऊ शकतो. संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून 10 जूनपर्यंत व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून सामान्य वेळेपेक्षा लवकर येत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. 1 जूनपर्यंत गोव्यात आणि 5 जूनपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठीही ही बातमी दिलासा देणारी आहे. केरळमधील मान्सूनचा प्रारंभ हा देशात मान्सूनच्या आगमनाचा अधिकृत संकेत मानला जातो.

मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असली तरी, महाराष्ट्रात मे महिन्याच्या मध्यात हवामानाने मोठे बदल दाखवले आहेत. घ्श् ने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, म्हणजेच या भागात जोरदार आणि अतिवृष्टीची शक्यता आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघरसह उर्वरित 29 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारे वाहू शकतात.