Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा


उसने दिलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून वारंवार छळ व मारहाण करून आंबूताई अशोक हजारे (रा. दत्तनगर) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सावत्र भाऊ ज्ञानदेव उर्फ प्रकाश गजानन म्हेतर, त्यांची पत्नी सिंधुबाई म्हेतर व मुलगा संदीप म्हेतर या तिघांची येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंदार नेर्लेकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्या वतीने अ‍ॅड. मेहबूब बाणदार यांनी काम पहिले.


या घटनेची पार्श्‍वभूमी अशी, इचलकरंजीत राहणार्‍या सावत्र बहिणीला 6 हजार रुपये संशयित ज्ञानदेव यांनी हात उसने दिले होते. पण तिने ते पैसे परत केले नसल्यामुळे तिचा सतत छळ करून तिला मारहाण केली. त्यातूनच तिने 13 जुलै 2015 रोजी दत्तनगर येथे भाड्याच्या घरात चिट्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली, अशाप्रकारची फिर्याद 16 जुलै 2015 रोजी मयताचा मुलगा दीपक अशोक हजारे याने शहापूर पोलीस ठाणे येथे दिली होती. त्या अनुषंगाने संशयितांच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालायात झाली.
सुनावणीत तपासी अधिकारी विठ्ठल भालेराव, मयताचा पती अशोक हजारे, मुलगा फिर्यादी दीपक हजारे यांनी सरकार पक्षाच्या वतीने साक्ष दिल्या. मात्र संशयितांच्यातर्फे अ‍ॅड. मेहबूब बाणदार यांनी घेतलेल्या उलटतपासात मुलाच्या कर्जबाजारीपणामुळे, कारखाना विकला गेल्याने आंबूताई मानसिक तणावामध्ये होती व तशीच

वर्दी 13 जुलै 2015 रोजी दीपकने पोलीस स्टेशनला दिल्याचे साक्षीदारांनी कबूल केले. त्याचबरोबर मयताचा मुलगा प्रकाश याचे गुन्हेगारी रेकोर्ड होते, दीपकवरही खटला दाखल होता हे साक्षीदारांनी कबूल केले. उशिरा फिर्याद दिली, उसने पैसे दिल्याचा कोणताही पुरावा नाही यासह अनेक गोष्टी युक्तीवादात मांडल्या. आत्महत्येचे घटक सिध्द होत नाही हे दर्शविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे 5 वेगवेगळे निकालही सादर केले. अ‍ॅड. बाणदार यांचा युक्तीवाद व उलटतपास ग्राह्य मानून न्यायालयाने सर्वच संशयितांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.