Spread the love

ठाणे / महान कार्य वृत्तसेवा

अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. यासह सेंद्रिय आणि यांत्रिक शेतीकडं वळण्याची गरज यावर भर दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्वीच्या आढावा बैठकीत बोलत होते.

पावसाळ्यापूर्वी जलसाठ्यांची कामं पूर्ण करा : ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्वीच्या आढावा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. ”शेतकऱ्यांना गट, सेंद्रिय खत आणि यांत्रिक शेती करण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. या योजनांचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ दिला पाहिजे,” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. विविध पिकांना प्रोत्साहन देण्यासह बहुआयामी दृष्टिकोनाचे आवाहन त्यांनी केलं आणि अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी जलसाठ्यांवरील कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण आणि खत वेळेवर उपलब्ध करून द्या : ”शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं आणि खतं वेळेवर उपलब्ध करून दिली पाहिजेत. यासह मातीचा पोत सुधारण्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिलं पाहिजे,” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीत बोलताना म्हणाले. ”’फळ पीक विमा योजना’ आणि ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना’ यासारख्या उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी आवश्यक आहे,” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. कोणताही पात्र पीएम किसान लाभार्थी वंचित राहू नये यासाठी त्यांनी 100 टक्के खरीप कर्ज वितरण आणि वेळेवर ॲग्रीस्टॅक नोंदणीवर भर दिला.