Spread the love

श्रीनगर / महान कार्य वृत्तसेवा

दहशतवादासाठी तुमच्या जमिनीचा वापर नको, हाच पाकिस्तानला संदेश आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, अशा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. ते श्रीनगरच्या दौऱ्यावर आल्यानंतर बोलत होते.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, हुतात्मा झालेल्या सैनिकांना नमन आहे. संपूर्ण देशाला सैनिकांचा गर्व आहे. हाच संदेश घेऊन येथं मी आलो आहे. आपल्या सैन्याचा निशाणा अचूक आहे, हे जगाला माहित आहे. ऑपरेशन सिंदूर ही सर्वात मोठी कारवाई आहे. वेळप्रसंगी आपण कठोर निर्णय घेतो. आपली सेना हल्ला करते, तेव्हा मृतदेह मोजण्याचं काम शत्रू करतो. कुठेही लपले तरी दहशतवाद्यांना सोडणार नाही. त्यांनी पहलगाममध्ये धर्म विचारून निर्दोष पर्यटकांवर ठार केलं. आम्ही त्यांचं कर्म पाहून अद्दल घडविली आहे. हाच आपला धर्म आहे.

पाकिस्तानला भारतानं दिला इशारा-पाकिस्ताननं नेहमीच भारताला दगा दिला आहे. आमच्या माथ्यावर वार केला. आम्ही त्यांची छाती फोडली आहे. विश्वासघाताची जबर किंमत पाकिस्ताननं मोजली आहे. पाकिस्तान कर्जात बुडाला आहे, त्याविषयी काय बोलणार? पाकिस्तान जिथे जातो, तिथे देणेकऱ्यांची रांग लागते. सीमेपलीकडून हल्ला झाला तर युद्ध मानले जाईल. पाकिस्तानसोबत आता पाकव्याप्त काश्मीरबाबत चर्चा केली जाईल. दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालणार नाही. अण्वस्त्रच्या हल्ल्याला भारत घाबरणार नाही, असा सूचक इशारा राजनाथ सिंह यांनी दिली.