Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

22 एप्रिल जम्मूच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जवान पूर्णम शॉ यांनी चुकून भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यांना पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतलं होतं. जवळपास 20-22 दिवस पाकिस्तानांच्या ताब्यात राहिलेल्या पूर्णम शॉ यांना पाकिस्तानने अखरे भारतात सोडलं आहे. यावर त्यांची पत्नी रजनी शॉ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

”पूर्णम शॉ 20 दिवस भारतात नव्हते. पाकिस्तानात अटकेत होते. आज सकाळीच साडेदहा वाजता फोन आला की ते भारतात आले आहेत. ते पूर्णपणे व्यवस्थित आहेत. त्यांनी मला व्हिडिओ कॉलही केला होता. ते एकदम व्यवस्थित आहेत”, असं पूर्णम शॉ यांच्या पत्नी रजनी शॉ म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, ”मुख्यमंर्त्यांबरोबर माझा संवाद झाला होता. त्यांनीही सांगितलं होतं की याच आठवड्यात ते परत येतील. सर्वांनी सहकार्य केलं. संपूर्ण देश माझ्या पाठीशी होता.” ”22 एप्रिलला पहलगाम अटॅक झाला. त्यानंतर 15 ते 20 दिवसांत ऑपरेशन सिंदूर राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या सौभाग्याचा बदला घेतला. त्यानंतर तीन ते चार दिवसांनी त्यांनी माझं सौभाग्य परत आणलंय”, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.