Spread the love

अमृतसर / महान कार्य वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत देशाला उद्देशून संबोधन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी सैनिकांशी संवाद साधला.

आदमपूर येथील हवाई तळाच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींच्या एक्स हँडलवरून पोस्ट करण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटलं, मी आज सकाळी एएफएस आदमपूरला भेट दिली. यावेळी आमच्या पराक्रमी हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचं प्रतीक असलेल्या जवानांना भेटणं हा अतिशय खास अनुभव होता. सशस्त्र दलांनी देशासाठी केलेल्या कार्याबद्दल देश नेहमीच त्यांचा आभारी राहणार आहे.

पंतप्रधानां मोदींनी सोमवारी राष्ट्राला उद्देशून केलं भाषण- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरची कामगिरी केल्यानं पराक्रमी सैनिक, सशस्त्र दल, गुप्तचर संस्था आणि शास्त्रत्रांचं कौतुक केलं. प्रत्येक दहशतवाद्याला देशातील मुली आणि बहिणींच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याची किंमत कळाली आहे, असे सांगत त्यांनी आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. भारत केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरबाबत चर्चा करू शकतो. त्या संदर्भात तिसऱ्या पक्षाला हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.

राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांचं केलं कौतुक- भाजपा खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी पंतप्रधान मोदींनी भाषणाचं कौतुक केलं. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी जगासमोर भारताच्या प्राधान्यांची स्पष्टपणे मांडणी केली. त्यांनी भारताच्या अटी काय आहेत, हे स्पष्ट केल्या आहेत. जर कोणी भारतावर आक्रमण किंवा दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर भारत निर्णयाक पद्धतीनं प्रत्युत्तर देईल, असा मोदींनी इशारा दिला. महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनीही पंतप्रधानांचे कौतुक केलं. फुटीरतावादी राजकारणात न अडकता राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबींना पाठिंबा देण्याचं त्यांनी राजकीय पक्षांना आवाहन केलं.

ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत 9 दहशतवादी तळ उद्धवस्त- भारतीय सशस्त्र दलानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त करून सुमारे 100 दहशतवाद्यांना ठार केले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केल्यानं भारतानं ही कारवाई केली होती.