ऑपरेशन सिंदूरमधील योद्ध्यांची कौतुकाने पाठ थोपटली
दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (13 मे) सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची नरेंद्र मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली. आज सकाळी कोणतीही सूचना न देता नरेंद्र मोदींनी वायुदलाच्या हवाई योद्धांची भेट घेतली. आदमपूर हवाई तळ (पंजाब) हा भारतीय हवाई दलाच्या मिग-29 चा तळ आहे. येथील स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर्स म्हणून ओळखले जाते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 51 जण ठार, पाकिस्तानची कबुली-
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत पाकिस्तानचे 11 सैनिक मारले गेल्याची कबुली पाकिस्तानने दिली. आधी कांगावा करणाऱ्या पाकिस्तानने आता थेट सैनिक मारले गेल्याची कबुली दिलीय. ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 51 जण मारले गेल्याचं पाकिस्तानने म्हटलंय. त्यातले 11 सैनिक आहेत. त्यात 6 पाकिस्तान आर्मीचे तर 5 पाकिस्तान वायुदलाचे सैनिक आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त-
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यामध्ये सीमारेषेपासून 100 किलोमीटर आत असलेल्या बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या तळाचाही समावेश होता. भारताने क्षेपणास्त्र डागून हे सर्व तळ उद्ध्वस्त केले होते.
