Spread the love

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा

पन्हाळा तालुक्यातील कोतोली (ता.पन्हाळा) परिसरात उष्म्याचा कडाका आणि जंगलात पाण्याचा तीव्र अभाव यामुळे एका रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोतोली गावाच्या उत्तरेस असणाऱ्या गारुडकीच्या जंगलात घडली असून, दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे पाण्याच्या शोधात आलेल्या गव्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती वनरक्षक बाजीराव देसाई यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, गारुडीच्या मळ्याजवळील एका ओढ्याच्या काठावर मंगळवारी सकाळी एका शेतकऱ्याच्या निदर्शनास मृत गवा आढळून आला. त्याने तातडीने याबाबतची माहिती वनविभागाला दिली. यानंतर वनरक्षक बाजीराव देसाई, वनसेवक आनंद कांबळे, सौरभ उडळे व फायर वॉचर प्रदीप अंगठेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर संबंधित प्राणी नैसर्गिकरीत्या मृत झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच जंगलात पुरून टाकण्यात आला.

ही घटना केवळ एका रानगव्याच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांसमोरील संकट किती तीव्र होत आहे, याचा गंभीर इशारा आहे. पन्हाळा तालुक्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून, जंगलालगतच फार्म हाऊसेसचे आक्रमण वाढले आहे. आहे. त्यामुळे जंगलांतील निसर्गसाखळी खंडित होत असून, नैसर्गिक जलस्रोत आटत चालले आहेत.

यासोबतच रात्रीच्या वेळेस लायटिंगचा अतिरेक, म्युझिक सिस्टिमचा गोंगाट व वाहतुकीचा वाढता दबाव यामुळे वन्यप्राणी अस्वस्थ होत आहेत. परिणामी हे प्राणी मानवी वस्त्यांच्या सीमारेषा ओलांडून पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात शेतांमध्ये प्रवेश करू लागले आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, स्थानिक शेतकरीही यामुळे हैराण झाले आहेत.

वन्यप्राण्यांच्या अशा मृत्यूमागे मानवी हस्तक्षेप हे मोठे कारण असून, यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात आणखी गंभीर परिणाम भोगावे लागतील. एकीकडे शासन ‘वनसंवर्धन’ व ‘पर्यावरण संवर्धन’ यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहे, तर दुसरीकडे याच शासन यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे वन्यजीवसंवर्धन धोक्यात आले आहे.

या घटनेमुळे वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जंगलात पाणवठ्यांची संख्या वाढवणे, नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन करणे, फार्महाऊसेसवर नियंत्रण आणणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे हे काही तातडीचे उपाय असू शकतात. मात्र या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात होणे गरजेचे आहे.

स्थानिक निसर्गप्रेमी आणि वन्यजीवसंवर्धन कार्यकर्त्यांनी यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरणीय समतोलासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.