Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
शेअर ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरद्वारे भरपूर नफा मिळवण्याचे अमिष दाखवून डॉ. दशावतार गोपालकृष्ण बडे (वय 56, रा. जवाहरनगर) यांची 93 लाख 35 हजार रुपये फसवणुक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आणखीन दोघांना अटक केली आहे.  रितेश अरुण वंजारी (वय 36 रा. नागपूर) व बंधन बँकेचा सेल्स मॅनेजर अनिष रशिद शाह (वय 32 रा. हिंगणा रोड नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी डिसेंबर 2024 मध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर मोहन महादेव साहु (वय 38, रा. देवळी रोड, धुळे) याला यापूर्वी अटक केली असून आरोपींची संख्या तीन झाली आहे.  
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजीतील डॉ. दशावतार बडे यांना अ‍ॅक्सीस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य मार्गदर्शक केरशी तावडिया आणि सहाय्यक राशी अरोरा यांनी कंपनीच्या गुंतवणुकीविषयी आकर्षक परताव्याचे आश्‍वासन दिले.

डॉक्टरांचा विश्‍वास संपादन करुन त्यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. 13 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत डॉ. बडे यांनी 93 लाख 35 हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये भरले. मात्र या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉ. बडे यांनी कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात बडे यांच्याकडून घेतलेली रक्कम कानपूर, कोलकत्ता आणि आसाममधील बँकेत ट्रान्स्फर झालेली रक्कम मोहन साहु यांच्या खात्यावर जमा झाली. आणि त्याने ती रक्कम काढून घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोहन साहू याला 1 एप्रिल रोजी अटक केली. तर या प्रकरणातील रितेश वंजारी व अनिष शाह यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. साहू याला बँकेतून पैसे काढून ते वंजारी व शाह यांना दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.