Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले आहे. मुंबईच्या शेअर बाजारात अर्थात बीएसईमध्ये सोमवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. हे शेअर 43.50 रुपयांवर पोहोचले. कंपनी तोट्यातून नफ्यात परतली आहे. रिलायन्स पॉवरने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाहीत 126 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 397.56 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न चौथ्या तिमाहीत 2066 कोटी रुपये होते. गेल्या वर्षी याच कालावधीत रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न 2193.85 कोटी रुपये होते. कंपनीचा एकूण खर्च मार्च 2025 च्या तिमाहीत 1998.49 कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 2615.15 कोटी रुपयांवर होता.

आर्थिक वर्ष 2024-25 चा विचार केला तर रिलायन्स पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा 2947.83 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला 2068.38 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. गेल्या एका वर्षात रिलायन्स पॉवरचे शेअर्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 मे 2024 रोजी 24.40 रुपये होती. 12 मे 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 43.50 रुपयांवर पोहोचले. गेल्या पाच वर्षांबद्दल बोलायचे झाले तर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. 15 मे 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 1.80 रुपयांवर होते. 12 मे 2025 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 43 रुपयांच्या पुढे गेले. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 265 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 53.64 रुपये आहे. त्याच वेळी, रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 23.30 रुपये आहे.