Spread the love

राजीव घई यांनी ‘हा’ दिला इशारा

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला भारतानं अद्दल घडविल्यानंतर महत्त्वाची अपडेट आहे. भारत-पाकिस्तानमध्ये आज दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा होणार आहे. पाकिस्तानकडून सामंजस्य शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असताना त्याबाबत भारतानं रविवारीच इशारा दिला आहे.

सैन्यदलाच्या मोहिमांचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, भारतीय सशस्त्र दलांनी रविवारी पाकिस्तानी डीजीएमओ यांना हॉटलाइनवर संदेश पाठवला. दोन्ही सैन्यांमध्ये एक दिवस आधी झालेल्या कराराचं पाकिस्तानकडून उल्लंघन झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. भविष्यात अशी आगळीक पुन्हा झाली तर भारत कठोर आणि स्पष्ट पद्धतीनं प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.

भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ कोण आहेत?सैन्यदलाच्या मोहिमांचे महासंचालक हे सैन्यदलाचे नियोजन आणि सीमा मोहिमांचे प्रभारी एक उच्चपदस्थ सैन्यदलाचे अधिकारी असतात. भारतात हे पद सामान्यत: लेफ्टनंट जनरलकडे असते. सध्याचे भारतीय डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई आहेत. लेफ्टनंट जनरल घई यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये साउथ ब्लॉक येथील आर्मी मुख्यालयात डीजीएमओ पदाची सूत्रे स्वीकारली होती. याआधी त्यांनी श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्‌‍स (15 व्या कॉर्प्‌‍स) चे कमांडिंग-इन-चीफ म्हणून सुमारे दीड वर्षे काम केलं आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला आहेत.

काय असते डीजीएमओ यांची भूमिका?22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी डीजीएमओ संपर्कात राहिले. डीजीएमओ यांच्याकडं सैन्यदलाच्या कारवायांचे नियोजन आणि देखरेख करण्याची जबाबदारी असते. त्यामध्ये सैन्यदलाच्या लढाऊ मोहिमा आणि दहशतवादविरोधी कारवायांचादेखील समावेश असतो. कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सशस्त्र दल सुसज्ज ठेवण्याची डीजीओमओ यांच्याकडं जबाबदारी असते.

डीजीएमओ हे सैन्यदलाच्या इतर शाखा आणि विविध सरकारी मंत्रालयाशी समन्वय साधतात. सीमेवर तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानी डीजीएमओ यांच्याबरोबर दर आठवड्याला संवाद साधला जातो. डीजीएमओ हे सैन्यदलाचे प्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाला नियमितपणे विविध कारवायांची माहिती देतात.

तणावाच्या काळात डीजीएमओ यांच्याकडे काय असते जबाबदारी? जेव्हा तणाव वाढतात, तेव्हा डीजीएमओ हे बहुतेकदा संपर्कासाठी पहिले व्यक्ती असतात. डीजीएमओकडे यांच्याकडे हॉटलाईन असल्यानं गैरसमज टाळण्यास मदत होते. तसेच सीमेवरील संघर्ष नियंत्रित करता येतो. सैन्यदलाला जलद निर्णय घेणे, रिअल-टाइम माहिती मिळवणे आणि सैन्याच्या हालचाली करणं आणि शस्त्रसंधी उल्लंघनासारख्या समस्या हाताळणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या डीजीएमओ यांच्यावर असतात. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानने लष्करी कारवाई थांबवण्यास सहमती दर्शविल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने नियमाचे उल्लंघन केले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पाकिस्तानवर कराराचे उल्लंघन केल्याचा पत्रकार परिषदेत आरोप केला. पाकिस्तानला उल्लंघन थांबवण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आणि परिस्थितीला गांभीर्याने आणि जबाबदारीनं हाताळण्याचे आवाहन मिस्त्री यांनी केले.