पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा
पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील भूमि अभिलेख कार्यालयाच्या कारभारामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः नाकी नऊ येत आहेत. उतारे, दाखले, वारसनोंदी, मोजणीसारख्या अत्यावश्यक कामांसाठी या कार्यालयावर नागरिकांचा मोठा विसंबा आहे. मात्र, सद्यस्थितीत हे कार्यालय जनतेच्या अडचणी सोडवण्याऐवजी त्यांचे हाल अधिकच वाढवत असल्याचा आरोप परिसरातील लोकांकडून सातत्याने होत आहे.
कोतोली कार्यालयाच्या अखत्यारीत कोतोली, मानेवाडी, भाचरवाडी, तिरपण, पुनाळ, माळवाडी, कळे, सावर्डे तर्फे असंडोली, मल्हारपेठ, मोरेवाडी, कसबा ठाणे, महाडिकवाडी, माजलगाव, शिंदेवाडी, खोतवाडी, पडळ, सातार्डे, पोर्ले ठाणे, येवलुज आदी गावांचा समावेश होतो. या गावांतील अनेकांचे अंतर १५ ते २० किलोमीटरपर्यंत असूनही, कार्यालय आठवड्यातून फक्त एकदाच उघडले जाते. त्यामुळे एवढ्या अंतरावरून आलेल्या नागरिकांची अवस्था अतिशय दयनीय होते.
दाखले आणि कागदपत्रांची वेळेवर पूर्तता न झाल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. “आज मोजणीसाठी गेलेत”, “दुसऱ्या कार्यालयात प्रभारी काम आहे”, “आजारी असल्यामुळे आले नाहीत” अशा कारणांचे बडगे नागरिकांच्या समोर वारंवार उभे राहतात. त्यामध्ये सत्य किती आणि टाळाटाळ किती, हे समजणे कठीण आहे.
हे कार्यालय सामान्य जनतेच्या कामासाठी असले तरी येथे फक्त विशेष वशिला लावणाऱ्यांचीच कामे तात्काळ मार्गी लागतात, अशी तक्रार स्थानिकांकडून वारंवार ऐकू येते. कोणी प्रभावशाली व्यक्ती आली तर तिच्यासाठी चहा-पाणी होतं, विशेष लक्ष दिलं जातं, आणि कामे झटपट मार्गी लागतात. पण सामान्य नागरिकाला मात्र फक्त आश्वासनांवर समाधान मानावे लागते. त्यांची कामे आठवड्यानुवारी पुढे ढकलली जातात, आणि शेवटी त्यांना वर्षानुवर्ष हेलपाटे मारावे लागतात.
या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांचे उपस्थिती वेळापत्रकही अनियमित असल्याने नागरिकांचे प्रलंबित प्रकरणे वाढतच चालली आहेत. कामासाठी आलेल्या लोकांना रोजच “आज होईल”, “उद्या या”, “फाईल शोधतोय” अशा उत्तरांनी थांबवले जाते. हे उत्तर सर्वसामान्यांसाठी आरक्षित असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
“सरकारी काम आणि चार दिवस थांब” ही म्हण जणू या कार्यालयासाठीच अस्तित्वात आलेली आहे. शासकीय कार्यालये ही सामान्य जनतेच्या सेवा सोयीसाठी असतात, मात्र कोतोली कार्यालयाचा अनुभव याच्या अगदी उलट आहे. येथे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची मानसिकता जनतेवर अधिराज्य गाजवण्याची वाटते. जनतेच्या वेळेची, कामाची किंमत येथे कोणालाही नसल्याचे दिसते.
हे सारे चित्र पाहता, सामान्य नागरिकांमध्ये आता रोष निर्माण होऊ लागला आहे. “जर हे कार्यालय जनतेची कामे करू शकत नसेल, तर त्याला तात्काळ बंद करून दुसरी प्रभावी व्यवस्था निर्माण करावी” अशी ठाम मागणी सर्वसामान्यांमधून होऊ लागली आहे. सरकारी यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरीत पावले उचलावीत, अशी अपेक्षा आता सर्वत्र व्यक्त होत आहे.
या कार्यालयाच्या कामकाजातील शिथिलता, मनमानी, आणि सामान्य जनतेच्या सेवेशी असलेला उदासीन दृष्टिकोन पाहता, कोतोली भूमि अभिलेख कार्यालय हे “असून अडचण आणि नसून खोळंबा” असेच झाल्याची भावना आता जनतेमध्ये खोलवर रुजली आहे.

