इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी परिसरात वळीव पावसाबरोबरच अन्य पाण्याच्या उपलब्धमुळे जनावरांच्या चारा पिक उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. याचाच परिणाम बाजारात चा-याचे दर एका पेंडीमागे पाच रुपये कमी झाला आहे. त्यामुळे पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
इचलकरंजी शहर परिसरात शेती व त्याच्याशी पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे शेतातील पिक उत्पादनावरच जनावरांच्या चा-याचे आर्थिक गणित अवलंबून असते.मागील काही दिवसात हवेत मोठ्या प्रमाणात उष्मा निर्माण होऊन त्याचा परिणाम जोरदार वळीव पावसाने हजेरी लावली.त्यामुळे शेतातील सर्व पिकांना मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता होण्यास मोठी मदत झाली.मध्यंतरी, कडक उन्हाळा , नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने पाणी टंचाई निर्माण होऊन शेतातील पिके वाळून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती.
तसेच जनावरांच्या चा-याचे दरही प्रति चा-याची पेंडी १६ ते १७ रुपये झाली होती.त्यामुळे आधीच पशुखाद्याचे वाढलेले दर आणि त्यात चा-याचे दर वाढल्याने आर्थिकदृष्टया परवडत नसल्याने पशुपालन व्यवसाय करणेच मोठे जिकिरीचे झाले होते.परंतू ,काही दिवसांपूर्वी वळीव पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण होण्यास मदत झाली.याचा थेट परिणाम जनावरांना उपलब्ध प्रमाणात चारा उपलब्ध झाल्याने साहजिकच चारा पेंढीचे दर प्रति पेंढी १२ ते १३ रुपये झाला आहे.सध्या वैरण बाजारात गवत ,मका ,शाळू ,हत्ती घास असा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.यामध्ये गवत १०० रुपये ८ पेंडी , हत्ती घास १०० रुपये ६ पेंडी ,शाळू १०० रुपये ७ पेंडी आणि मका १०० रुपये ७ पेंडी अशा दराने चा-याची विक्री सुरु असल्याचे चारा व्यापारी संतोष चव्हाण ,यश बेलेकर यांनी सांगितले.एकंदरीत , वळीव पावसाने चा-याची चांगली उपलब्धता होऊन प्रति पेंडीमागे ५ रुपये दर कमी झाल्याने पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
