नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर टीका केली. त्यांच्या विधानावर आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद, बासित अली यांनी आक्षेप घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे यावर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत कदाचित पाकिस्तानला सहभागी केले जाणार नाही, असे सुनील गावसकर म्हणाले होते. यंदा भारत आणि श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. या हल्ल्यात 26 लोकांचा बळी गेला. सदर हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा आरोप करत भारताने सिंधू जल करारास स्थगिती देऊन पाकिस्तानवर इतरही काही निर्बंध लादले आहेत.
सुनील गावसकर एका वाहिनीशी बोलत असताना म्हणाले, ”भारत सरकाच्या मार्गदर्शक धोरणानुसार बीसीसीआयचा कारभार चालतो. सध्या दोन देशातील तणावाची परिस्थिती पाहता पाकिस्तानला या स्पर्धेपासून दूर ठेवले जाईल. आशिया चषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहे. त्यामुळे सध्याचे चित्र बदलले नाही तर पाकिस्तानचे आशिया चषकात खेळणे अवघड आहे. मी तरी पाकिस्तानला आता आशिया चषकाचा भाग होताना पाहू शकत नाही.”
सुनील गावसकर यांच्या विधानावर खंत व्यक्त असताना जावेद मियांदाद म्हणाले की, सनी भाई हे बोललेत यावर मला विश्वास बसत नाही. ते एक आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व साधे असून ते आजवर राजकारणापासून दूर राहिले आहेत.
पाकिस्तानचा माजी फिरकपटू इक्बाल कासिम यानेही गावसकर यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले. ”गावसकर हे दोन्ही देशांत लोकप्रिय असलेले एक जबाबदार व्यक्तिमत्त्व आहेत. राजकारण आणि खेळ याच्यात गल्लत करता कामा नये.
बासित अली म्हणाले, स्टुपिड
मियांदाद आणि इक्बाल कासिम यांच्यापेक्षा थोडा वेगळा स्वर लावत बासित आली यांनी गावसकर यांच्यावर तीव शब्दात टीका केली. त्यांनी गावसकर यांच्या विधानाला ‘स्टुपिड’ म्हटले. ”गावसकर यांनी कोणतेही आरोप करण्यापूर्वी पुरावे दाखवावेत. आधी चौकशी होऊ द्या. राजकीय शत्रुत्वाच्या पलीकडे जाऊन क्रिकेटकडे पाहिले पाहिजे”, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार मोहम्मद रिझवान याने मात्र कोणतीही टीका न केली नाही. राजकारणात काहीही झाले तरी क्रिकेट सुरू राहिले पाहिजे, असे मत त्याने व्यक्त केले.
