५ पासून १० टक्क्यांपर्यंत व्याजदराने पठाणी वसुली
घोसरवाड / महान कार्य वृत्तसेवा
घोसरवाड (ता.शिरोळ) सारख्या ग्रामीण भागात खासगी सावकारांचे अक्षरशः पेव फुटले आहे. समोरील गि-हाईक भेटेल तशी व्याजाची वसुली केली जाते. दरमहा ५ पासून १० टक्क्यांपर्यंत व्याजदराने आगाऊ रक्कम कपात करूनच पैसे दिले जातात. मासिक १० टक्के आकारणी म्हणजे वर्षाला दामदुप्पट होते, त्याची परतफेड करणे कोणालाही अशक्यच होते. त्याचबरोबर भिशीच्या माध्यमातून मोठे रॅकेट गावागावांत सक्रिय झाले असून, त्यातही अडले-नडले बळी पडल्याचे वास्तव समोर येत आहे.
बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर जिल्हा निबंधक व उपनिबंधक यांनी भिशीच्या नावाखाली खाजगी सावकारी करणाऱ्या विरोधात सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सावकारकीच्या व्याजाला बळी पडलेले अनेकप्रकार पुढे येत आहेत. आपली गरज काढल्याने फारसे कोणी तक्रारीसाठी पुढे येत नसले, तरी तोंड बंद करून मुक्याचा मार मात्र ते सहन करत आहेत.
घरात अचानक आजारी पडले, मुलीचे लग्न आहे, यांसह इतर कारणांसाठी सामान्य माणूस सावकारांच्या दारात जातो त्याच्या गरजेनुसार ५ते १० टक्के व्याजाने पैसे या भिशी चालकाकडून सावकारी नुसार पैसे दिले जाते. महिन्याच्या तारखेला व्याज मिळाले नाहीतर त्यावर दंड वसूल केला जातो. वसूलीसाठी गुन्हेगारी क्षेत्रातील गुंड ठेवले आहेत असे लोकाच्यातून चर्चा आहे.
केवळ खासगी सावकारच या व्यवसायात गुंतले असे नाहीत तर ‘भिशी’च्या गोड नावाखालीही ग्रामीण भागात सावकारकी जोरात सुरू आहे. ‘भिशी’ चालविणारे मालामाल झाले असून, त्यांचा दरही ५ ते १० टक्क्यापर्यंत असतो माणसे जोडण्यासाठी काहीनी तर एंजट ठेवले आहेत. अशा सर्व भिशीच्या नावाखाली सावकारी करणाऱ्यावर पोलीस प्रशासन व जिल्हानिबंधक यांनी कठोर कारवाई करून व्याजाला बळी पडणाऱ्या गरिब जनेतला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
