Spread the love

राज्याच्या विविध भागांना हवामान विभागाचा इशारा

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवसात राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकणसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील काही भागात 50 ते 60 किमी प्रति तासाने वेगाने वारे

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील काही भागात 50 ते 60 किमी प्रति तासाने वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. वाढत्या तापमानामुळं लोकांना घराबाहेर पडणे देखील मुश्कील झालं आहे. एका बाजूला तापमानाचा पारा वाढत असतानाच दुसऱ्या बाजुला पाण्याची कमतरता भासू लागली आहे. राज्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसात उत्तर कोकणसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अवकाळीचे वातावरण कशामुळं तयार झाले?

सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नसल्याचे खुळे म्हणाले. दरम्यान, अरबी समुद्रात दिड किमी उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी 45 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या आर्दतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल समजावा असे खुळे म्हणाले.

26 जिल्ह्यात दिनांक 4 ते 10 मे पर्यंत ढगाळ वातावरण राहणार

ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर पुणे सातारा सांगली सोलापूर, धाराशिव बीड नांदेड, गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती अशा 26 जिल्ह्यात दिनांक 4 ते 10 मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ ठिकाणी एखाद्या- दुसऱ्या दिवशी वीजा, वारा व गडगडाटीचे वातावरण राहून, झालाच तर अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी विशेष असे घाबरून जाऊ नये. केवळ सावधानता बाळगावी असे खुळे म्हणाले.