अजित पवारांचं उत्तर; उपमुख्यमंर्त्यांकडून 2 वाक्यातच भूमिका स्पष्ट
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची इच्छा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. दोन्ही पक्षाच्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेते व कार्यकर्ते एकत्र येण्याची भावना अनेकदा बोलून दाखवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी भूमिका स्पष्ट केली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे मी माध्यमातूनच ऐकतोय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची तशी भावना स्वाभाविक आहे, असे उत्तर अजित पवारांनी दिले. दरम्यान, राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (ऱ्ण्झ्) दोन गट पडले असून अजित पवारांच्या नेतृत्वात आमदारांनी सत्तेत सहभागी होणे मान्य केलं होतं. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे.
उद्धव ठाकरे अन राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू, असं सूचक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. पुण्यातील खेड राजगुरुनगर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर आपली भूमिका मांडली. त्यामुळे, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे. तर, दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यासंदर्भात आपली भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत महाराष्ट्राच्या हितासाठी, भल्यासाठी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं, अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांकडूनही आता तशीच भाषा बोलून दाखवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पालकमंत्रीपद नाही म्हणून काम अडलं नाही
रायगडला पालकमंत्री पद दिले नाही म्हणून काही अडलं आहे का, सर्व कामं होत आहेत, असे म्हणत एकप्रकारे अजित पवारांनी पालकमंत्रीपदाच्या वादावर भाष्य करणं टाळलं. तसेच, कोण काय बोललं याच्याबद्दल मला विचारू नका. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर देण्याचे टाळले.
पहलगाम हल्ल्याचा बदला घ्यायचा आहे
जम्मू काश्मीरमध्ये आमच्या पर्यटकांचा घात केला त्यांचा बदला घ्यायचा आहे, माझं देखील तेच मत आहे. आपण सगळे भारतीय आहोत, भारत कसा मजबूत आहे हे दाखवलं जाईल. पहलगाम हल्ल्यानंतील वारसांना 50 लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. निश्चितच घरातील कर्ता माणूस गेला की पैसे देऊन निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही, असेही अजित पवारांनी म्हटले.
मी शेतकऱ्यांबद्दल कसं बोलेन, मी स्वत: शेतकरी
राज्यातील काही अधिकाऱ्यांनी 100 दिवसांचा कार्यक्रम आधी गंभीरतेने घेतला नाही, पण आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आहे की चांगलं काम केलं पाहिजे. पिकविम्यात ज्यांनी चुकीचं केलं आहे, त्यांच्यासाठी मी बोललो होतो. बळीराजाला मी कसं काय बोलू शकतो, मी देखील शेतकरी आहे. काही महाठगांनी चुना लावला म्हणून मी बोललो, असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी आपल्या पिक विम्यासंदर्भातील वक्तव्यावर केले.
