बीएसएनएल ने ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा देतात : खा.धैर्यशील माने
बीएसएनएलने फोर जी सेवेच्या यंत्रसामुग्रीने कार्यान्वित करावी : खा.धनंजय महाडीक
बीएसएनएल कोल्हापूर सल्लागार समितीची बैठक संपन्न
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
बीएसएनएल कोल्हापूर विभागाची 2025-26 या वर्षातील पहिली दूरसंचार सल्लागार समितीची बैठक टेलिफोन भवन, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू छत्रपती हे उपस्थित होते. तसेच खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक आणि नवनियुक्त दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांच्या हस्ते खासदारांचा स्वागत सत्कार करण्यात आला. सल्लागार समिती सदस्यांचा स्वागत सत्कार उपमहाप्रबंधक विक्रांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, बीएसएनएल ने ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा प्रदान करण्या संबंधी सूचना दिल्या. बीएसएनएल ने मोबाईल सेवेच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करता फोर जी सेवेचा शुभारंभ केलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत या सेवेचा फायदा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून बीएसएनएलची दूरसंचार क्षेत्रातील हिस्सेदारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
खासदार धनंजय महाडिक म्हटाले, ऑप्टिकल फायबर ने जोडल्या गेलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे बंद अवस्थेत असलेले कनेक्शन सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले. तसेच जून 2025 पर्यंत बीएसएनएलचे सर्व मोबाईल टॉवर्स फोर जी सेवेच्या यंत्रसामुग्रीने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, बीएसएनएलने इतर मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी मोबाईल टॉवरची संख्या वाढवून जलद इंटरनेट सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करून केंद्र शासन सदैव बीएसएनएलच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
या बैठकीस उपमहाप्रबंधक व्ही.एम.पाटील, विक्रांत देशमुख, अरविंद कुलकर्णी, सहाय्यक महाप्रबंधक मार्केटिंग दिलीप मोहिते, वीणा संकेश्वरी, वाणिज्य अधिकारी जानव्ही काळे, महादेव देवाडीग, पी.एस.भारमल, रमण तेंडुलकर, सुधीर चव्हाण, प्रशांत पाटील, अमोल ढाले, प्रकाश खोराटे यांच्यासाह सर्वच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्वागत,प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन विजयानंद माने यांनी तर आभार दिलीप मोहिते यांनी मानले.
चौकट-
खासदार धनंजय महाडिक यांनी बीएसएनएलच्या सभागृहास “छत्रपती ताराराणी सभागृह” हे नाव देण्यासाठी ठराव मांडला. उपस्थित सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात हा ठराव मंजूर केला.
