मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याचे काँग्रेस पक्ष स्वागत करतो. काँग्रेस पक्ष व लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करावी, ही मागणी सातत्याने लावून धरली होती. काँग्रेसशासित राज्यात जातनिहाय जनगणना करण्यात आली आहे. पण भाजपाला याला विरोध होता. आता केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे पण जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, कोषाध्यक्ष डॉ. अमरजितसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम, राजेश शर्मा, रमेश शेट्टी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व सेवादलाचे पथक उपस्थित होते.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम केले व स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने विकासाची पायाभरणी करून देशाला जगात एक मजबूत राष्ट्र म्हणून उभे केले तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व काँग्रेस सरकार यांनी महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
