Spread the love

जेलची क्षमता 160 ची अन्‌‍ कैदी 320

एका बराकमध्ये 40 कैद्यांना ठेवण्याची वेळ
बीड/महान कार्य वृत्तसेवा
संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणातील मोक्का आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या टोळीमुळे, तसेच आर्थिक घोटाळ्यांतील आरोपी सुरेश कुटे, बबन शिंदे आणि सतीश ऊर्फ ‘खोक्या’ भोसले यांच्यामुळे बीड जिल्हा कारागृह गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आले आहे. त्यातच एका अधिकाऱ्यासह एका महिला शिपायाला निलंबित करण्यात आल्यामुळे हे कारागृह पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आता बीडच्या जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याचे समोर आले आहे.
ज्या कारागृहात केवळ 161 कैद्यांची क्षमता आहे, तेथे सध्या तब्बल 320 कैदी ठेवले गेले आहेत. यामध्ये सात कैदी शिक्षा भोगत असून उर्वरित सर्व न्यायप्रविष्ट (न्यायाधीन) कैदी आहेत. तर बीड जिल्हा कारागृहात एकूण आठ बराकी असून, एका बराकीत जवळपास 40 कैद्यांना एकत्र ठेवले जात आहे. ही परिस्थिती आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर ठरत आहे.
व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण
संतोष देशमुख कुटुंबीयांनी वाल्मिक कराडला जिल्हा कारागृहात मिळणाऱ्या विशेष सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. तर पूर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि गेवराई येथे दुय्यम कारागृहे कार्यरत होती. मात्र, त्या कारागृहांचे संचालन बंद करण्यात आल्याने सर्वच न्यायाधीन बंदींना आता बीड कारागृहात ठेवले जात आहे. परिणामी, व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
गँग वॉरमुळेही बीड कारागृह चर्चेत
गेल्या काही महिन्यांत गँग वादामुळेही कारागृह व्यवस्थापन अडचणीत सापडले आहे. वाद वाढल्यावर गित्ते गँगच्या सदस्यांना हसूर्ल कारागृहात, आठवले गँगच्या आरोपींना नाशिकला, दादा खिंडकर यांना हर्सूल येथे हलवण्यात आले. तर रणजित कासले यालाही सुरक्षा कारणास्तव बीडऐवजी हर्सूल कारागृहात हलवले गेले आहे. दरम्यान, विष्णू चाटे याने लातूरहून बीड कारागृहात बदलीची विनंती केली आहे. तर बीडच्या कारागृहाची क्षमता 160 कैद्यांचीच आहे. मात्र जिल्ह्यात दुसरे उपकारागृह नसल्याने सर्व कैद्यांना बीडच्या कारागृहात ठेवावे लागत आहे. सध्या बीडच्या कारागृहात 320 बंदी इथे आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे.