Spread the love

आयपीएस बिरदेव डोणे यांच्या रूपाने चांगला अधिकारी देशाला लाभला : माजी खासदार संजय मंडलिक
शिवराजमध्ये प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी साधला आयपीएस डोणे यांनी संवाद

मुरगूड/महान कार्य वृत्तसेवा
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाची वाटचाल केल्याने यूपीएससी परीक्षेत यश संपादन करता आले. संविधानाप्रमाणे प्रत्येकाने जीवनाची वाटचाल केली पाहिजे. संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. हा संवाद आहे यूपीएससी परीक्षेत देशातून 551 रँक प्राप्त केलेल्या आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांचा. ते आपण शिक्षण घेतलेल्या शिवराय विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूडच्या प्रांगणात प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संवाद साधताना व्यासपीठावरून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय मंडलिक होते.
डोणे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयापासून दूर राहावे, तरच जीवनात उत्तुंग भरारी घेता येईल. माझ्या घरच्या परिस्थितीतून मी ही प्रेरणा घेतली आहे. जीवनात सामान्य बनून राहण्यामध्ये आनंद आहे. छंद जोपासा, आवडीची क्षेत्रे निवडा, त्यामध्येच करिअर करा. क्षेत्रे निवडताना, समाधान मिळणारीच क्षेत्रे निवडा. पैसा कमी मिळाला तरी चालेल, याचे भान ठेवा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलो, नकारात्मक बोलणाऱ्या मित्रांचा सहवास टाळला. म्हणून हे संपादन करता आले. तुम्हीही चांगल्यांची संगत करा निगेटिव्ह मित्रांच्या सहवासात राहू नका.
पुस्तके माणसाला ठेच लागण्यापासून वाचवतात. तुम्हीच ठरवा पुस्तके वाचायची की अंगठा फोडून घ्यायचा ते. अपयश ही मानसिक स्थिती आहे. नवोदयच्या अपयशाने बरीच शिकवण मिळाली. त्यातूनच एन एम एम एस परीक्षेतील यश मिळवता आले . स्पर्धा परीक्षेची ती सुरुवात होती. गोट्या खेळाची आवड असणारा जर आयपीएस अधिकारी होऊ शकतो तर तुम्हीही प्रयत्नशील रहा. यश निश्चित मिळेल. इंग्रजी शिका सरावाने सर्व साध्य होईल. जीवनात यश संपादनासाठी बी प्लॅन तयार ठेवा.
माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, मानवी चेहरा लाभलेला अधिकारी आपल्याला लाभला आहे. इतक्या उत्तुंग यशानेही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. बिरदेव आमच्या शाळेचा विद्यार्थी असल्याचा आणि त्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाचा आम्हास खूप अभिमान वाटतो आहे.
बिरदेव डोणे यांचे शाळेच्यावतीने स्वागत मिरवणुकीने करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लोकनेते स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक यांचे समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अविनाश चौगले यांनी आयपीएस बिरदेव ढोणे यांची पॉडकास्टच्या माध्यमातून प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींशी प्रश्नोत्तराचे रूपात डोणे यांनी संवाद साधला. यामध्ये आरती गिरीबुवा, एम एन पाटील, त्रिशला निकम, अनुष्का अर्जुने, राजनंदिनी मुसळे, सौ चौगुले, पी.एम.फासके आदींनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
दरम्यान, आयपीएस बिरदेव ढोणे यांचा माजी खासदार संजय मंडलिक यांचे हस्ते मानाचा फेटा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्तीबद्दल साई कुस्त्या आखाड्याच्या महिला कुस्तीपटू पै.नंदिनी साळोखे व पै.स्वाती शिंदे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मुरगूडचे माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, जय शिवराय चे कार्यवाह आण्णासो थोरवत, मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव होडगे, संभाजी आंगज, वासुदेव डोणे, मंडलिक कारखान्याचे संचालक नारायण मुसळे, माजी नगरसेवक किरण गवाणकर, एस.व्ही.चौगले, दीपक शिंदे, अक्षय शिंदे, एम. आर.पाटील, माजी प्राचार्य महादेव कानकेकर, जी.के.भोसले, माजी उपप्राचार्य रविंद्र शिंदे, एल.व्ही.शर्मा, एस.एम.कुडाळकर, व्ही.बी.खंदारे आदिसह शिवराजचे माध्यमिक व ज्युनिअर विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा
आयपीएस डोणे यांनी शिवराज मध्ये 11 वी- 12 वीचे शिक्षण घेतले होते. कार्यक्रमानिमित्त शाळेत आल्यानंतर त्यांनी आपल्या वर्ग खोल्यांमध्ये जाऊन आपण बसत असलेल्या बाकावर ते विराजमान झाले. तसेच त्यांनी अभ्यास केलेल्या ग्रंथालयास व विज्ञान प्रयोगशाळेसही त्यांनी यावेळी भेट देऊन आपल्या मार्गदर्शक शिक्षकांशी हितगुज साधत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आयपीएस डोणेंची विनम्रता
प्रश्नोत्तर प्रसंगी आयपीएस डोणे यांचेशी संवाद साधताना त्यांचेच शिक्षक एम एन पाटील यांनी “सर आपण “ असा आदरयुक्त शब्दप्रयोग करताच, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी डोणे यांनी अत्यंत विनम्रपणे “सर मी तुमचा विद्यार्थी आहे. मला सर, आपण असे न बोलवता तुम्ही बिरदेव म्हणून संबोधले तरी चालेल ते मला खूप आवडेल असे उद्गार काढताच उपस्थितीतांनी त्यांच्या या वक्तव्यास टाळ्यांची दाद दिली.