Spread the love

जयसिंगपूर /  महान कार्य वृत्तसेवा 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ज्यादा परताव्याचे अमिषा दाखवून  ४३ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुजय सुकुमार पाचोरे, अनुष्का सुजय पाचोरे (दोघे रा. नांद्रे ता. मिरज) व चेतन देवगोंडा पाटील, सुप्रिया चेतन पाटील (दोघे रा. चिपरी ता. शिरोळ) व  स्नेहल बिपिन चौगुले, बिपिन कुबेर चौगुले (दोघे रा. शिरटी ता. शिरोळ) यांच्या विरोधात जयसिंगपुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अजिंक्य बाळासाहेब बाबर यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. याप्रकरणी सुजय सुकुमार पाचोरे याला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली असून शनिवारी येथील न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, दि.१३ जुलै २०२२ ते १८ ऑगस्ट २०२३ च्या मुदतीत जयसिंगपूर येथे वरील सर्व संशयित आरोपी यांनी फिर्यादी अजिंक्य बाबर यांचे विश्वास संपादन करून संगणमत करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून प्रति महीना 5 टक्के ज्यादा परतावा देतो असे आमिष दाखविले. वेळोवेळी ८८ लाख २४ हजार रुपये इतकी रक्कम घेऊन त्यातील ४४ लाख ७१ हजार रुपये परत देऊन उर्वरित ४३ लाख ५३ हजार रुपये इतकी रक्कम अजिंक्य बाबर यांना परत न करता वरील सर्व संशयित आरोपी यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली आहे. वारंवार पैशाची मागणी करून ही त्यांनी घेतलेली रक्कम दिली नाही. त्यामुळे फिर्यादी बाबर यांनी जयसिंगपूर पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.