Spread the love

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पक्ष संघटनेची बैठक घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र या बैठकीत ते पक्षातील नेत्यांवर चांगलेच उखडलेले दिसले. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नक्की विजय होणार, असे सांगताना त्यांनी पक्ष संघटनेतील मरगळ झटकून टाकण्याचे आवाहन केले. तसेच ”काही लोक आतून भाजपाला मदत होईल, असे काम करत आहेत. अशा 10, 15, 20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल”, असा स्पष्ट इशारा राहुल गांधी यांनी दिला.
अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दिले. ते म्हणाले, ”गुजरातमधील व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांना आता पर्याय हवा आहे. त्यांना ‘बी’ टीम नको आहे. पक्षात जे दोन गट पडले आहेत, त्यात विभागणी करणे, ही माझी जबाबदारी आहे. पहिले काम म्हणजे दोन गटांना वेगळे करायचे. यासाठी कडक कारवाई करावी लागली. 10, 15, 20 किंवा 30 लोकांना काढावे लागले तरी आपण त्यांना काढून टाकू.”
भाजपासाठी काँग्रेसमध्ये राहून काम करतात. त्या लोकांना बाहेर काढून खुलेपणाने काम करण्यास मोकळीक देऊ. तुम्हाला तिथे काहीही किंमत मिळणार नाही, ते तुम्हाला बाहेर फेकतील, अशी भावना राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.
राहुल गांधी पुढे म्हणाले, ”आपला जिल्हाध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष किंवा ज्येष्ठ नेता असो, त्याच्या हृदयात काँग्रेस असायला हवी. विजय किंवा पराभवाची गोष्ट सोडा. काँग्रेसचा कार्यकर्ता असो किंवा नेता, त्याचा हात जर कापला तर त्यातूनही काँग्रेस वाहायला हवी. संघटनेचे नियंत्रण अशा एकनिष्ठ लोकांच्या हातात जायला हवे. आपण जेव्हा हे काम करू, तेव्हा गुजरातमधील जनता वादळाप्रमाणे आपल्या संघटनेत सामील होण्याचा प्रयत्न करेल.”