Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्यभरात उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे. अशातच आता मार्च महिन्यात नागरिकांना उन्हाच्या झळा आणखी सोसाव्या लागणार आहेत. मार्च महिन्यात तापमानात अधिक वाढ होऊन सरासरी तापमान 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच निघा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्हांमध्ये तापमानाची नोंद वाढत चालली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 35 ते 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात सातत्याने तापमान वाढत आहे. दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये साधारणपणे 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत विक्रमी उष्णतेची लाट
यंदाच्या उन्हाळी मोसमात मुंबईत विक्रमी उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ‘पूर्वेकडील वारे जोरदार असल्याने, ते पश्चिमेकडील वारे, म्हणजेच समुद्री वारे, येण्यास विलंब करतील. यामुळे, रविवारपासून शहरात सामान्यपेक्षा 4-5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा आहे’ असे आयएमडी मुंबईच्या शास्त्रज्ञ निथा शशिधरन यांनी म्हटले आहे. हा इशारा 9 मार्च ते 11 मार्च दरम्यान लागू आहे, आठवड्याच्या शेवटी तापमान 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.