मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली. तसेच वाल्मीक कराड याला सुदर्शन घुलेने कॉल केला होता, अशी माहिती पोलिसांनी सादर केलेल्या आरोप पत्रातून समोर आली आहे. तसेच नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेलवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे.
संतोष देशमुख आडवा आला तर….
नांदूर फाटा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची तिरंगा हॉटेलवर भेट झाली. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा निरोप विष्णू चाटेने सुदर्शन घुले याला दिला होता, अशी धक्कादायक माहिती दोषारोप पत्रातून समोर आली आहे. तसेच संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ कॉल सुरू होता. जयराम चाटे याने एका ग्रुप वर तो कॉल केला होता. वाल्मीक कराड याला सुदर्शन घुलेने कॉल केल्याची माहिती देखील आहे.
पहिला आरोपी वाल्मीक कराड
पोलिसांनी सादर केलेल्या आरोप पत्रामध्ये पहिला आरोपी वाल्मीक कराड आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी व हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केल्याने आता वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. हे तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप आहे. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातात असल्याचं देखील समोर आलंय. दरम्यान, एक नंबरचा आरोपी वाल्मीक कराड, दोन नंबर विष्णू चाटे तीन नंबर सुदर्शन घुले, चार नंबर प्रतीक घुले, पाच नंबर जयराम चाटे, सहा नंबर सुधीर सांगळे, सात नंबर सिद्धार्थ सोनवणे आणि आठवा नंबर कृष्ण आंधळेंचा आहे.