Spread the love

नागपूर/महान कार्य वृत्तसेवा
छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य घराघरात पोहोचवण्यासाठी ‘छावा’ चित्रपटाला माहिती देणारे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यानेच फोनवरून धमकी दिल्याचा उलगडा झाला आहे. कोल्हापूर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने सीडीआर मधून ही माहिती उघडकीस आणली आहे. त्यामुळे तो मी नव्हेच अशी भूमिका घेणारा प्रशांत कोरटकर तोंडघशी पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकर वर आता पोलीस कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी बाह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर शेअर केली आहे. ज्यामध्ये ”जिथं असाल तिथे येऊन बाह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ध्वनिफीत मधून दिसून येते. या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने सीडीआर आणि लोकेशन याबाबत माहिती गोळा केली आहे. त्यातून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करणारा व्यक्ती हा प्रशांत कोरटकरच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.